मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित राहून एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आपण एक ऐतिहासिक लढा लढत आहात, अशा शब्दात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
‘१९६० नंतर महाराष्ट्राच्या इतिहासातला कामगार चळवळीतला एक ऐतिहासिक लढा आपण सर्व एसटी कर्मचारी लढत आहात याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन. गेले १५- २० वर्षे अशी चर्चा होती की, कामगार चळवळ संपली पण ती चळवळ जिवंत आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेत,’ असे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणार अगदी तुमच्या अधिवेशनात जाऊन सोडवू. परबांना सांगितले तुम्ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी घ्या आणि मी अर्थमंत्र्यांची जबाबदारी घेतो,’ असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
एसटी कर्मचारी आपल्या रास्त मागण्यांसाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतायत. त्यांना समर्थन देण्यासाठी आज आझाद मैदानात पोहोचलो. आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार @GopichandP_MLC आणि @Sadabhau_khot आणि कर्मचारी बंधू भगिनींच्या लढ्याला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. pic.twitter.com/OVntQafImM
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 17, 2021
‘तुम संघर्ष करो, हम साथ है..’ असेही ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे आणि मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याने विरोधी पक्षाने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व करत आहेत. त्याच बरोबर आशिष शेलार, चित्रा वाघ आदी नेते मंडळींनीही आझाद मैदानावर उपस्थित राहून संपला पाठींबा दर्शवला आहे.