पूर्वनियोजित हल्ला असल्याचा उदय सामंतांकडून आरोप
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवार, २ ऑगस्ट रोजी पुण्यातील कात्रज परिसरात हा हल्ला झाला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कात्रजमध्ये काल सभा होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सभेसाठी गोळा झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याच्या मागे उदय सामंत यांची गाडी होती. सिग्नल लागल्यामुळे त्यांची गाडी सिग्नलवर थांबली असता, अचानकपणे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल आणि माध्यमांच्या कॅमेरात कैद झाला आहे.
हा हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा गंभीर आरोप उदय सामंत यांनी केला आहे. हल्ल्या प्रकरणात कोथरुड पोलीस ठाण्यात सामंत यांनी तक्रार दिली आहे.
“काहीजण सांगत आहेत की त्यांनी माझा ताफा अडवला. ते धादांत खोटं आहे. माझी गाडी सिग्नलला थांबली होती. माझ्या बाजूला दोन गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यातून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हातात बेस बॉलची स्टिक होती, एकाच्या हातात दगड होता. ते समोर येऊन शिव्या घालत होते आणि दुसऱ्या बाजूला ५० ते ६० जणांचा मॉब होता. डाव्या बाजूला एसपीओ माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो होते. त्याबाजूला दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होत, त्यांच्या हातात सळईसारखं काही होतं,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत
राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं
खुर्ची गेल्यावर आठवला दिलदारपणा!
या हल्ल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा प्रकार अत्यंत चुकीचा असून आक्रमक भाषणांमधून असे प्रकार घडत आहेत. आक्रमक भाषण करण्याचा उद्देश हाच आहे. त्यामुळेच शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यासाठी आदित्य ठाकरेंची यात्रा सुरू आहे,” असे दीपक केसरकर म्हणाले.