उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना, या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडून केला जात आहे. एनआयएने सचिन वाझे याला ताब्यात घेतले आहे. आज ठाणे सत्र न्यायालयात सचिन वाझे याला ताब्यात घेण्यासाठी युक्तिवाद करताना, काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याची माहिती एटीएसने दिली. एटीएसला वाझे यांचे प्रॉडक्शन वॉरंट मिळवण्यात यश आले आहे.
मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात काही महत्त्वाचे पुरावे हाती असल्याची माहिती एटीएसने ठाणे सत्र न्यायालयात दिली. त्याबरोबरच, प्रथमदर्शनी मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणात वाझे याचा सहभाग असल्याचे न्यायालयाला दिलेल्या जबाबात एटीएसने म्हटले आहे. त्यामुळे वाझे यांचा ताबा मिळावा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सचिन वाझे यांचे प्रॉडक्शन वॉरंट मिळाल्याने एटीएसच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची शक्यता बळावली आहे.
हे ही वाचा:
फडणवीसांचे नागरिकांना लस घेण्याचे आवाहन
‘या’ तेलगू अभिनेत्रीचे मशिदीवर बिनधास्त बोल
एटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?
मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची १७ फेब्रुवारी रोजी भेट झाली असल्याचे देखील उघड झाले आहे. जीपीओ जवळ सुमारे दहा मिनीटे ही भेट चालली, आणि त्याच दिवशी हिरेन यांची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेली. दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी याबाबत एफआयआर देखील दाखल केला होता. मात्र त्यांनी आपल्या जबाबत वाझेशी भेट झाली नसल्याचे म्हटले होते.
एनआयए बरोबरच एटीएस देखील याप्रकरणात ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्युचे गुढ लवकरात लवकर उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.