घरात बसून महाराष्ट्राचा गाडा हाकत असल्याबद्दल सातत्याने टीकेचे धनी होत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेटण्याची वेळ आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकर याच्या कुटुंबियांवर ओढवली. त्यामुळे हे सरकार संवेदनाहीन आहे, अशी टीका होऊ लागली आहे.
एमपीएससी उत्तीर्ण होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या २४ वर्षीय स्वप्निल लोणकरने निराशेतून आत्महत्या केली होती. त्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला होता. एमपीएससी उत्तीर्ण होऊनही नियुक्त्या न झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. त्याच निराशेतून लोणकरने आत्महत्या केली होती. त्यानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात अनेक आंदोलने झाली. पण सरकारने त्यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.
गेल्या आठवड्यात प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी गेले होते. तशीच त्यांना स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांची भेट घेता आली असती. पण स्वप्निलच्या कुटुंबियांनाच शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटून आपले दुःख सांगावे लागले. त्यानंतरही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, धीर सोडू नका, स्वप्निलच्या बहिणीच्या नोकरीचे बघू या शब्दांचाच दिलासा या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून मिळाला. त्यामुळे ठाकरे सरकार संवेदनाशून्य आहे, निबर कातडीचे आहे अशी टीका होऊ लागली आहे.
हे ही वाचा:
भाईचा बड्डे…पोलीस स्टेशनमध्ये साजरा
“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”
वेबसाईट हँग; दहावीची मुले त्रासली
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री या नात्याने ते फार कमी वेळा जनसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाहेर पडले आहेत. गेल्या वर्षी आलेले निसर्ग वादळ, यंदाचे तौक्ते वादळ यामुळे कोकणाला बसलेला जबरदस्त फटका, नाशिकला ऑक्सिजन टँकरची झालेली गळती आणि त्यात झालेले मृत्यू अशा अनेक दुर्घटनांनंतर मुख्यमंत्री प्रत्यक्षात जनसामान्यांना भेटलेच नाहीत. त्यामुळे निदान स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना भेटून ते त्यांचे दुःख जाणून घेतील, काही मदत दिली जाईल अशी अपेक्षा होती. पण शेवटी लोणकरच्या कुटुंबियांनाच मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपल्या वेदना मांडाव्या लागल्या.