आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत आतिशी यांचे सरकार सत्तेत आले आहे. आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी शनिवार, २१ सप्टेंबर रोजी राज निवास येथे आतिशी यांना मुख्यमंत्री पदाच्या गोपनीयतेची शपथ दिली. आतिशी यांच्या मंत्रिमंडळात पाच मंत्र्यांचा समावेश असून त्यांनी आतिशी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
कालकाजी, दिल्ली येथील आमदार आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातून जामीनावर बाहेर आल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू होती. पुढे आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
हे ही वाचा..
लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधींचे दान
तिरुपती लाडू प्रकरणात ‘अमूल’चे नाव घेतल्याबद्दल तक्रार दाखल
प्रसादाच्या लाडूला पुन्हा मिळाले पावित्र्य
हवाई दलाच्या प्रमुख पदी एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी आरोप आहे. तसेच, ईडीने त्यांच्यावर दारू घोटाळ्याच्या पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आणि या घोटाळ्याचा पैसा गोवा निवडणुकीत वापरल्याचा आरोप केला होता. दरम्यान, अरविंद केजरीवाल अनेक महिने तुरुंगात होते. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कठोर अटींवर जामीनही मिळाला आहे ज्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही निर्णयावर स्वाक्षरी करण्यास मनाई आहे आणि दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाण्यासही त्यांना मनाई आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देऊन आतिशी मार्लेना यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली. शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी आतिशी यांनी इतर पाच मंत्र्यांसह पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आतिशी यांच्यासोबत सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.