आज विधिमंडळ अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. कालच्या दिवसात कसबा पेठ निकाल, ते शेतकऱ्यांच्या बांधावरचा कांदा असे मुद्दे गाजले होते. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यावर उत्तर देणार आहेत. विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक होणार असून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाबाबत चर्चा होणार आहे. या समितीचे अध्यक्ष राहुल कूल यांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडणार आहे. या समितीचे राहुल कुल हे प्रमुख असणार आहेत. कुल यांच्या अध्यक्षतेत एकूण १५ सदस्य या समितीत असल्याची घोषणा केली आहे. या समितीत हक्कभंगाची सूचना मांडणारे भाजपा आमदार अतुल भातखळकर हेदेखील आहेत.तसेच विविध पक्षांचे आमदार यांचा सुद्धा यात समावेश असणार आहे.
काय आहे विधिमंडळाचे हक्कभंग?
राज्यघटनेच्या अनुच्छेद अनुक्रमे १०५ आणि १९४ प्रमाणे संसद आणि विधिमंडळ यांना विशेषाधिकार बहाल केलेले असतात. त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मुक्तपणे काम करता यावे. कुठलाच दबाव असू नये आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देता यावा यासाठीचे हे अधिकार देण्यात आलेले असतात. लोकप्रतिनिधी ना विधिमंडळ आणि संसदेत बोलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते. त्यांनी सभागृहात केले ले आरोप , वक्तव्ये आणि देण्यात येणारी माहिती यासाठी लोकप्रतिनिधी विरोधात कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला दाखल करू शकत नाहीत किंवा कोणतीही कारवाई करता येत नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कोणीही अडथळा किंवा दबाव आणल्यास किंवा सन्मान ना राखला गेल्यास हक्कभंगाची कारवाई होऊ शकते.
हे ही वाचा:
हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे सुश्मिता सेनने लिहिले आणि…
दोघे गुजरातवरून आले आणि शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची भिंत ओलांडली
कसब्यावर बोलू काही… भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?
या आधी हक्कभंगाबाबत कोणाला शिक्षा झाली आहे?
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यांत माजी निवडणूक आयुक्त नंदलाल, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, बारमालक संघटनेचे अध्यक्ष मनजीत सिह सेठी आणि जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना विविध हक्कभंगासाठी वेगळ्या शिक्षा झाल्या आहेत.