आसाममध्ये ‘कॅटल प्रिव्हेन्शन बिल २०२१’ हा नवा कायदा येऊ घातला आहे. सोमवार, १२ जुलै रोजी आसामच्या विधानसभेत या कायद्याचा मसुदा मांडण्यात आला आहे. स्वतः आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी हा मसुदा मांडला आहे. यानुसार आसाममध्ये मंदिराच्या पाच किलोमीटरच्या आवारात गोमांस किंवा गोमांस असलेल्या उत्पादनांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे.
आसामच्या येऊ घातलेल्या या नव्या कायद्याने १९५० सालचा ‘कॅटल प्रिव्हेन्शन ॲक्ट’ रद्द होणार आहे. तर त्याची जागा हा नवा कायदा येणार आहे. या कायद्याच्या तरतुदी लक्षात घेता याला गोवंश बचाव कायदा असेही म्हणण्यात येत आहे. या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार हिंदू, जैन मंदिरांच्या आवारात किंवा शिखांच्या गुरुद्वाराच्या आवारात किंवा इतर कोणत्याही बीफ न खाणाऱ्या पंथांच्या धार्मिक स्थळांच्या आवारात पाच किलोमीटर पर्यंत गोमांस विक्रीवर किंवा गोमांस असलेल्या उत्पादनांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे.
हे ही वाचा:
महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश
विजयी भव! पंतप्रधान साधणार भारताच्या ऑलिम्पिक चमूशी संवाद
एकनाथ खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली
१९५० सालचा आसामच्या कॅटल प्रिव्हेन्शन ऍक्टनुसार १४ वर्षावरील गाईंना किंवा पूर्णपणे निरुपयोगी झालेल्या गाईंना स्थानिक पशु वैद्यकीय अधिकाराच्या परवानगीने कत्तल करता येणे शक्य होते. हे या नव्या कायद्याने बंद होणार आहे. तर गुरांचे बेकायदेशीर दळणवळण बंद होणार आहे. राज्यांतर्गत किंवा राज्याच्या बाहेर गुरांचे दळणवळण करण्यासाठी विशिष्ट अधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता भासणार आहे.
या नव्या कायद्याच्या मसुद्यानुसार गुरांची विक्री ही केवळ परवानाधारक पशूंच्या बाजारातच करणे शक्य होणार आहे. तर या बाजारांना संपूर्ण खरेदी-विक्री व्यवहारांचा पुरावा द्याव्या लागणार आहे आणि तोही ठरवलेल्या आराखड्यानुसार. या सर्व व्यवहारांची व्यवस्थित नोंद ठेवणे बंधनकारक असणार आहे. या गोष्टींचे पालन केले गेले नाही, तर त्या बाजाराचा परवाना रद्द करण्याचीही तरतूद या कायद्यात असणार आहे.