कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे अखेर निकाल गुरुवारी जाहीर झाले आणि त्यात भाजपाला संमिश्र यश मिळाले. कसबा या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभव स्वीकारावा लागला तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर त्यात विजयी ठरले. मात्र चिंचवड मतदारसंघात दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना विजय मिळाला.
रवींद्र धंगेकर यांनी ही निवडणूक ११ हजार ४० मताधिक्याने विजय मिळविला आहे. भाजपाचे या मतदारसंघात गेली २८ वर्षे वर्चस्व होते. ते हिसकावून घेण्यात काँग्रेसला यश आले आहे. मात्र तिकडे चिंचवडला महाविकास आघाडीला यश मिळाले नाही. कसब्यात महाविकास आघाडीची एकी दिसली असे म्हणताना तीच एकी चिंचवडमध्ये का दिसली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कसब्यातील पराभवाला नेमकी कोणती कारणे आहेत, याचीही चर्चा आता विविध माध्यमांवर सुरू आहेत.
या निवडणुकीत सर्वांचे लक्ष कसबा मतदारसंघावर होते कारण तिथे भाजपाची सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू होते. पहिल्या फेरीपासून धंगेकर आघाडीवर होते आणि ती आघाडी त्यांनी शेवटपर्यंत टिकविली. धंगेकर यांना ७३ हजार १९४ तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली.
हे ही वाचा:
ही जगताप साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे’
हिंगोलीत अल्पवयीन मुलाने कुह्राडीने केली वडिलांची हत्या
कसहा मतदारसंघात भाजपने १९९५पासून वर्चस्व प्रस्थापित केले होते. गिरीश बापट यांनी हा मतदारसंघ राखला होता. यावेळी आजारपणातही ते मतदानासाठी आणि प्रचारासाठीही उपस्थित होते. त्यावरून विरोधकांनी टीका केली होती पण बापट यांनी पक्षनिष्ठा दाखवून दिली.
या मतदारसंघात २०१९मध्ये गिरीश बापट हे खासदार झाले. त्यानंतर तिथे मुक्ता टिळक या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली.