अशोक चव्हाण म्हणतात दोन दिवसांत स्पष्ट करणार राजकीय भूमिका

राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया

अशोक चव्हाण म्हणतात दोन दिवसांत स्पष्ट करणार राजकीय भूमिका

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. तर, यापूर्वी मिलिंद देवरा यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता अशोक चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले आहेत.

“मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना भेटून दिला आहे. त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, विधीमंडळ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही. माझ्या मनात कुणाबद्दल व्यक्तिगत भावना नाही,” असं अशोक चव्हाण म्हणाले.

“मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रमाणिकपणे काम केलं आहे. यापुढची राजकीय दिशा, मी एक-दोन दिवसात निर्णय घेऊन जाहीर करेन. भाजपाची कार्यप्रणाली मला अद्याप माहिती नाही. मी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही,” असं अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राजीनामा का दिला याचे स्पष्टीकरण देताना अशोक चव्हाण म्हणाले की, “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे, असं काही नाही. मी अनेक वर्षांपासून, जन्मापासून ते आतापर्यंत काँग्रेसचं काम केलं आहे. मला वाटतं की, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे.”

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर सोबत किती आमदार येतील असा प्रश्न विचारल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, “पक्षाचा राजीनामा देणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी कोणत्याही आमदारांशी, सहकार्यांशी चर्चा केली नाही. मी माझा निर्णय येत्या एक दोन दिवसात ठरवेन. मी पक्षातील अंतर्गत कोणत्या गोष्टींना चव्हाट्यावर मांडणार नाही. मी तसा व्यक्ती नाही. मी कालपर्यंत प्रदेश कार्यालयाच्या बैठकीत हजर होतो. पण आजपासून मी पक्षात न राहण्याचा निर्णय घेतला आहे.”

हे ही वाचा:

भारतातील उद्योग संघटना एक राष्ट्र, एक निवडणुकीच्या पाठीशी

‘जे मोदींवर टीका करतात, त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळते’

हल्द्वानी हिंसाचाराप्रकरणी ३० जणांना अटक

मोठा निर्णय! ‘सीआरपीएफ’ची परीक्षा मराठीत देता येणार

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण हे काही काळ नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. शिवाय भाजपाच्या कार्यालयात काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरु असल्यामुळे ते भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.

Exit mobile version