भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्यावर मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात त्यांच्या एका वक्तव्याप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला होता. त्यानंतर आशिष शेलार हे पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यावेळी आशिष शेलार यांनी माध्यमांशी संपर्क साधला.
या प्रकरणाबद्दल बोलताना आशिष शेलार यांनी सांगितले की, आम्ही कायदा मानणारे लोक आहोत. माझ्यावर खोटा गुन्हा दखल केला गेला त्यावरही कायदेशीर पद्धतीने जामीन घेतल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. वक्तव्याबद्दल भूमिका आधीच स्पष्ट केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पोलीस दलाचा गैरवापर, सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. मी कोणत्याही महिलेचा, महापौरांचा अपमान केलेला नसताना दोन पोलीस ठाण्याला फौजदारी गुन्हा दाखल केला आहे, असे शेलार म्हणाले.
आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, तर मुंबईकरांचा आवाज भाजप अजून उचलून घेईल, असे आशिष शेलारांनी म्हटले आहे. मी कोणाचेही नाव घेतले नव्हते मात्र महापौरांचे नाव या प्रकरणात जोडले गेल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला… राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली माहिती
३७० हटवल्यावर काश्मीरमधून हिंदू पळाले का? किती अतिरेकी मारले गेले?
भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रद्धांजली
मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन प्रकरण वाढवले गेले, या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन. महिलांचा अपमान करणे हा स्वभाव नाही आणि तसे आमचे संस्कारही नाही. महापौर किशोरी पेडणेकर यांचा आणि माझा गेले अनेकवर्षांचा स्नेह असून आम्ही नगरसेवक म्हणून एकत्र काम केले आहे, असेही आशिष शेलार म्हणाले.
विरोधी पक्ष नेते आणि माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी या प्रकरणी बोलताना सांगितले की, भाजपचा कोणताही नेता विशेषत: आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरु शकत नाहीत. महापौरांबद्दल तर अजिबात नाही. आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकपणे बोलतात त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किंवा आशिष शेलार महिलांबद्दल कोणतेही गैरशब्द वापरणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.