राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आज २३ फेब्रुवारी रोजी सकाळपासून ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून आरोप प्रत्यारोपांचे सत्र देखील सुरू झाले आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी या कथेचा संदर्भ देत नवाब मलिकांना टोला लगावला आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….! असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच!” आशिष शेलार यांनी असे ट्विट करत नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.
हे ही वाचा:
‘दाऊद सबंधितांशी नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध’
नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु! आज अटक होणार?
‘दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल’
हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार
बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० वाजता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या मुंबई येथील निवास्थानी दाखल झाले. त्यानंतर नवाब मलिक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. कुर्ल्यातील एक मोक्याची जमीन अगदीच तुटपुंज्या किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर पत्रकार परिषदेत केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्या संदर्भात पुरावे दिले होते. याच व्यवहारासंदर्भात नवाब मलिक यांची चौकशी सध्या सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.