राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोमात

राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोमात

‘महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत पण हे सारेच प्रश्न आज कोमात आणि सरकारमधील पक्षांची स्वबळाची छम छम जोमात’ असे राज्याचे चित्र असल्याची सडेतोड टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. संघटनात्मक आढावा बैठकीसाठी पिंपरी-चिंचवड भागाचा दौरा करताना शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

बुधवार, २१ जुलै रोजी आमदार आशिष शेलार हे पक्षाच्या संघटनात्मक कार्यासाठी पिंपरी-चिंचवड येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारची चांगलीच खरडपट्टी केली. “सरकारच्या तीन पक्षांमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ एकच चर्चा असते ती म्हणजे आम्ही स्वबळावर लढणार आणि स्वबळावर लढणार” असा घणाघात शेलार यांनी केला आहे.

एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरे त्यावर अग्रलेख लिहीणार, मग तीसरे दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र भेटतात, अशी सगळी स्वबळाची छमछम सोडली तर राज्यात दुसरे काहीच ऐकायला येत नाही. हा दुसरे काही येत असेल तर लेडीज बारची छमछम.. ऐकू येते हे मिडियानेच काल उघड केली. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असून त्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी नाही.

हे ही वाचा:

जिन्ना हाऊस म्हणजे फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ

‘आमचे उद्धव काका’ या विषयावर आता निबंध!

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार

२०३२ चे ऑलिम्पिक ‘या’ शहरात होणार…

शेतकरी, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, पाऊस, पुर, कोरोना, लाँकडाऊन, अडचणी आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण असे राज्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत… मात्र सगळे प्रश्न कोमात आणि सरकार मधील तीन पक्षांमध्ये स्वळाची छमछम जोमात, असे चित्र राज्यात असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

तर पुण्यात भूखंडाचे श्रीखंड पार्ट २ सुरु असल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे. पुणे पीएमआरडीए करुन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून हे सुरु आहे. ५० हजार कोटींचे भूखंड या प्राधिकरणाकडे गेले कसे? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. या समितीत भाजपाचे आमदार का नाहीत? यातून एक मोठा घोटाळा केला जात असून.आम्ही तेही योग्य वेळी ऊघड करु, असा इशाराही त्यांनी दिला.

Exit mobile version