संघाला विरोध मग पीएफआयच्या पाठीशी का?

आशिष शेलार यांच्या उद्धव ठाकरेंवर घणाघात

संघाला विरोध मग पीएफआयच्या पाठीशी का?

भारतीय जनता पार्टीचे जागर मुंबईचा हे अभियान सुरु आहे. या अभियानाअंतर्गत २२ वी जाहीर सभा अंधेरी पश्चिम येथे पार पडली. यावेळी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतंत्र आंदोलनात कुठे होता? संघाची टोपी काळी का आहे? असे सवाल अनेकदा विचारले जातात. मात्र, हेच लोक पीएफआयवरील बंदीचे समर्थन करण्यास तयार नाहीत. संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलु का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार म्हणाले, सप्टेंबरमध्ये पीएफआयवर बंदी आणली. पीएफआय ज्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला धोका दिला ज्यांचे सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानशी बंध आहेत. त्या पीएफआयवर अमित शहांच्या नेतृत्वात छापे टाकले. १०६ लोक पहिल्या दिवशी आणि २२७ लोकांना दुसऱ्या दिवशी अटक करून त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठीही उद्धव ठाकरे तयार नाहीत. मात्र संघाची कोणती गोष्ट आली की, संघाची टोपी काळी का? संघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता का? संघाने संयुक्त महाराष्ट्रमध्ये फुट का टाकली? संघ भारतमुक्त का होऊ नये ही भाषणे उद्धव ठाकरेंची आहेत, असं आशिष शेलार म्हणाले.

जर तुम्ही संघावर बंदी उपस्थित करता मग पीएफआय काय राष्ट्रभक्त आहे का? पीएफआयने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता का? पीएफआयच्या विरोधात तुम्ही का नाही बोलत? असे सवाल शेलार यांनी ठाकरेंना उपस्थित केले आहेत. सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या,जातीच्या विरोधात नाही. तर आम्ही तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ करणारे आहोत. मग मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? असे प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

पुढे आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे शिवसेनकडून मराठी आणि मुस्लिम मत जुळवली जात आहेत. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा ठाव हा रडीचा डाव केला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतं मागण्याचा कार्यक्रम हा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. मात्र, हिंदू मराठी आणि मुस्लिम मते ही भाजपाला मिळणार, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला आहे. तसेच पैसे खाण्याची स्पर्धा ठेवली तर उद्धव ठाकरे यांच्या गटाचा पहिला नंबर येईल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांना ईव्हीएम मशीनमध्ये दोष दिसू लागला

अमेरिकेतही गुजरात निवडणुकीची रणधुमाळी, कार रॅलीतून भारतीयांचे समर्थन

दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या यात्रेला म्हटलं ‘बारात’

लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!

आशिष शेलार यांच्यसह अतुल भातखळकर यांनीसुद्धा ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, २५ वर्षे सत्तेत राहून मुंबईकरांना त्यांनी लुटण्याचे काम केले. आता बंगले पडायला येत आहेत म्हणून मुंबईच्या जनतेच्या मनात फूट पडणायचे त्यांचे काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करून त्यांचे राजकरण सुरु असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

Exit mobile version