“मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत?”

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

“मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत?”

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची मुंबईत रविवार, १७ मार्च रोजी सांगता झाली. यावेळी इंडी आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला उपस्थित होते. या नेत्यांनी केलेल्या भाषणात भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. अशातच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकात्मक भाषणावरून भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये बावनकुळे यांनी म्हटले आहे की, “आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते. मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही,” अशी घाणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंना ‘न्याय सभे’त फारच केविलवाणा ‘न्याय’ मिळाला? – आशिष शेलार

भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका करताना काही तिखट प्रश्न उपस्थित केले आहेत. आशिष शेलार म्हणाले की, “आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन, आपल्याला हवे तेवढे, शिवतीर्थावर भाषण करणारे श्रीमान उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा ‘न्याय’ मिळाला? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल ‘मर्दा’सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने ‘हिंदुत्वाला केले तडीपार’ हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच ‘शिवतीर्थावर’ सभा घेण्यात आली होती का? सभा एक झाली पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेली,” असे अनेक सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा:

अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; मालगाडीला धडकून चार डबे रुळावरून घसरले

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा १६ वर्षांचा दुष्काळ संपला!

सर्वाधिक निवडणूक रोखे देणाऱ्या कंपनीकडून ५०९ कोटी द्रमुक पक्षाला

हिमांशू, ओजस्वीने जिंकली सुवर्णपदके

“काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची ‘मशाल’ आता खंजीर, वाघ, मर्द, कोथळा अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!!” या शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.

आपल्या भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो” अशी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी इंडी आघाडीच्या नेत्यांसमोर भाषणाची सुरुवात अशी करणे टाळल्याने भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version