काँग्रेस ‘लोकतांत्रिक पार्टी’ असल्याचा अभिमान बाळगणारा पक्ष आहे. असे असताना त्याचे नेते लोकशाही पध्दतीने केलेल्या सूचनेसाठी कारणे दाखवा नोटीस बजावतात हा एक मोठा विनोद आहे. ओबीसी समाजात काँग्रेसच्या विरोधात काही भावना असेल, तर माफी मागून प्रकरण संपवलं पाहिजे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के ओबीसी आहेत, या वास्तवावर माझी ही सूचना आधारीत आहे. काँग्रेस हा नेहमीच ओबीसींचा पाठिंबा मिळत आलेला पक्ष आहे. हा समाज दुखावला गेला असेल तर माफी मागण्यात गैर काय, असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
काॅंग्रेस नेते राहुल यांनी सगळे मोदी कसे काय चोर असतात, असे विधान केले होते. त्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर त्यांना न्यायालयाने दिलेली २ वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच त्यामुळे त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी देशभरातील ओबीसी समाजाची माफी मागावी, असे मी सुचवले होते. या मत प्रदर्शनानंतर पक्षविरोधी भूमिका व्यक्त केल्याने प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्याला देशमुख यांनी उत्तर दिले आहे.
याआधीही मागितली होती माफी
उत्तरात त्यांनी म्हटले की, कोणतेही सबळ कारण नसताना मला कारणे दाखवा नोटीस बजावली ही दुर्दैवाची बाब आहे. राहुल यांच्या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की, जणू त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. आपण या अर्थाशी सहमत आहोत की नाही, हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. माझी सूचना पक्षाच्या हिताची होती. ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती. तसेच राफेल प्रकरणी त्यांनी मे २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती. मी त्यांना तसेच करण्यास सुचवले तर त्यात काय वावगे आहे? हा विषय संपवायला हवा असे मला वाटले आणि मी सूचना केली. कारण मला माहीत आहे की, पक्षाला बळकट करण्यासाठी ओबीसींना पुन्हा मोठ्या प्रमाणात काँग्रेससोबत आणले पाहिजे.
हे ही वाचा:
विरोधकांच्या प्रयत्नांवर अजित पवारांचा बोळा
इम्रान खान यांच्या तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणावर १२ एप्रिलला सुनावणी
तीन पत्तीचा डाव संपला, आता पोकर सुरू…
थोरले पवार अजितदादांच्या भूमिकेत; केली गांधी-ठाकरेंची बत्ती गुल
घराणेशाहीमुळे काँग्रेस कमकुवत
महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही काँग्रेसचे असंख्य ओबीसी नेते आहेत. माझा प्रश्न असा आहे की, ते ओबीसींसाठी काय करत आहेत? ते समाजाची नाराजी कमी करण्यासाठी किंवा त्यांचा योग्य वाटा त्यांना देण्यासाठी काय करत आहेत? दुर्दैवाने काहीच नाही. पक्ष एका नाजूक टप्प्यातून जात असताना, ते अद्याप पक्षांतर्गत गटबाजीत आनंद मानत आहेत. ते घराणेशाही कार्यशैलीने काँग्रेसला कमकुवत करत आहेत. त्यांचे प्रदीर्घ मौन आणि निष्क्रियता त्यांच्या अधूनमधून येणाऱ्या वक्तव्यांपेक्षा आणि कारणे दाखवा नोटीससारख्या कृतींपेक्षा जास्त बोलकी आहे.
व्यावहारिक सूचनेचा गैर अर्थ काढला जातो
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी मी कटिबद्ध आहे, हे सर्व लोकांना माहीत आहे. त्यासाठी मी माझे प्रयत्न करत आहे. आपल्या लोकसंख्येच्या या सर्वांत मोठ्या घटकाची दुर्दशा मला माहीत आहे आणि त्याचे प्रश्न जनतेसमोर मांडणे मला नेहमीच कर्तव्य वाटते. स्वनामधन्य काँग्रेस नेत्यांनी अन्य राष्ट्रीय/प्रादेशिक पक्षांकडे पाहावे, असे सुचवण्याचे धाडस मी करतो. भाजपने ओबीसी आउटरीच कार्यक्रमाची योजना आखली आहे. केंद्र आणि राज्यांमधील त्यांची सरकारे ओबीसींसाठी अनेक योजना राबवत आहेत. दुसरीकडे काँग्रेसला ओबीसींबद्दल कोणतीही चिंता वाटत नाही आणि लोकशाही मार्गाने केलेल्या व्यावहारीक सूचनेचा गैर अर्थ काढला जातो, हे वेदनादायक आहे.