‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून संजय राऊतांकडून अरविंद सावंतांची पाठराखण

सहजपणे बाहेरच्या उमेदवारासाठी वक्तव्य केल्याचा संजय राऊत यांचा दावा

‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून संजय राऊतांकडून अरविंद सावंतांची पाठराखण

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांचा ‘इम्पोर्टेड माल’ असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी अरविंद सावंत यांच्यावर शायना एनसी यांच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमधील नेते मात्र शांत असल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात असताना या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अरविंद सावंत यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, “भाजपाचे नेते पूर्वी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना ‘इम्पोर्टेड माल’ बोलायचे. भाजपच्या त्यावेळच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी हा शब्द वापरला आहे. अरविंद सावंत हे जबाबदार नेते आहेत. ते सहजपणे म्हणायला गेले की, मुंबादेवी येथील भाजपाचे उमेदवार (शायना एन सी) बाहेरून आल्या असून त्या ‘इम्पोर्टेड माल’ आहेत. यात महिलांचा अपमान कसा? मुंबादेवीत आयात केलेल्या नेत्यांबद्दल ते बोलत होते. शायना एनसी बाहेरुन आल्या आहेत, त्यांना विरोध होत आहे, असा अरविंद सावंत यांच्या बोलण्याचा अर्थ होता. ते बोलण्याच्या ओघात काही बोलले असतील,” असं संजय राऊत म्हणाले. शायना एन सी यांचा मुंबादेवीतून पराभव होताना दिसत असल्याने त्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची वक्तव्यं करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हे ही वाचा:

अहिल्यानगर पुणे महामार्गावरून २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने जप्त

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या प्रत्यापर्पणाची प्रक्रिया सुरू

दिवाळीच्या रोषणाईला विरोध करणाऱ्या तळोजामधील इमारतीला नितेश राणेंनी दिली भेट

बलुचिस्तानमध्ये स्फोट; शाळकरी मुलांसह पाच जणांचा मृत्यू

अरविंद सावंत यांनी ‘माल’ म्हणून संबोधल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. अरविंद सावंत यांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सावंत यांच्या अवमानजनक वक्तव्यामुळे राज्यातील नारीशक्ती येत्या निवडणुकीत ठाकरे गटाला धडा शिकवेल, असे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले आहे. शायना एन सी यांनी २८ ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबादेवीतून उमेदवारी दिली. मुंबादेवी जागेवर काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांच्या विरोधात शायना एनसी निवडणूक रिंगणात आहेत.

Exit mobile version