पंजाब विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) एका आमदाराने आरोग्य सुविधांच्या कमतरतेवरून स्वतःच्याचं सरकारवर जोरदार टीका केली. धर्मकोट येथील आप आमदार देविंदरजीत सिंग लड्डी ढोस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, त्यांच्या मतदारसंघाला आणि संपूर्ण मोगा जिल्ह्याला सरकारकडून सावत्र वागणूक मिळत आहे. यावेळी त्यांना राग अनावर झाला आणि ते म्हणाले की, मोगा पंजाबचा भाग नाही का? मला वाटतं आपण बहुधा पाकिस्तानात राहतो आहोत.
सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांनी आरोग्य क्षेत्रातील राज्य सरकारच्या कामावर टीका केल्यानंतर पंजाबमधील मान सरकार विधानसभेत अडचणीत आले. मोगा जिल्ह्यातील धरमकोट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे देविंदरजीत सिंग लड्डी ढोस यांनी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. बलबीर सिंग यांना धर्मकोटमधील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अपग्रेडेशन करण्याच्या योजनेबद्दल प्रश्न विचारला होता. आपला मुद्दा पुढे नेत आमदार म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आरोग्याशी संबंधित एकही प्रकल्प देण्यात आला नाही. त्यांनी मोगा जिल्ह्याविरुद्ध भेदभावाचा आरोप केला आणि अशी परिस्थिती का कायम आहे असा प्रश्न विचारला. यापूर्वी, शत्रुणा येथील आपचे आमदार कुलवंत सिंह बाजीगर यांनीही राज्यात वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला होता. बाजीगर म्हणाले की, त्यांच्या भागातील तीन रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे आणि आरोग्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणताही उपाय सापडलेला नाही.
आमदारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. बलबीर सिंग म्हणाले की, राज्य सरकारच्या विचाराधीन प्राथमिक आरोग्य केंद्राला उपविभागीय रुग्णालयात अपग्रेड करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. मंत्र्यांच्या उत्तराने समाधानी नसलेले ढोस म्हणाले की, त्यांच्या मतदारसंघाला आणि मोगा जिल्ह्याला राज्य सरकारकडून सावत्र वागणूक मिळाली आहे. तीन वर्षांत धर्मकोट विधानसभा मतदारसंघासाठी कोणताही आरोग्याशी संबंधित प्रकल्प राखून ठेवण्यात आला नाही, असा भेदभाव का?
पुढे ते म्हणाले की, “आम्हीही पंजाबचे रहिवासी आहोत, आमचा जिल्हा मोगा आहे, पण आमच्या विधानसभेला एकही आरोग्य प्रकल्प देण्यात आलेला नाही. पूर्वी ३०० तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्यात आली होती, त्यापैकी फक्त चार डॉक्टर मोगा येथे देण्यात आले होते. आता २५५ एमबीबीएस डॉक्टरांच्या नवीन भरतीत मोगा येथे फक्त चार डॉक्टर देण्यात आले आहेत, तर मालेरकोटलाला २८ डॉक्टर मिळाले आहेत. मोगासोबत हा भेदभाव का? मोगा पंजाबचा भाग नाही का? असे दिसते की आपण पाकिस्तानमध्ये राहत आहोत.”
हे ही वाचा..
कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल… एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
कुणाल कामरा, सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव
“युद्ध थांबवा!” म्हणत उत्तर गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांची हमास विरोधात निदर्शने
तुंगनाथ मंदिर मार्गावर जखमी युवकाचा यशस्वी बचाव केला
काँग्रेस आमदार हरदेव सिंग लड्डी (शाहकोट) यांनी सरकारच्या आरोग्य सेवांबद्दल प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, “राज्यपालांच्या अभिभाषणात आरोग्य सेवा सुधारल्याचे सांगून सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शाहकोट, महालन सिव्हिल हॉस्पिटल आणि महालन पीआयसीमध्ये आपत्कालीन डॉक्टरही नाहीत. दुपारी २- ३ नंतर डॉक्टर उपलब्ध नसतात. गरीब लोकांना उपचारही घेता येत नाहीत.”