राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने रुग्णांना मरायला सोडलंय का? असा सवाल माजी मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.
“जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. आज अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या इंजेक्शनसाठी जास्त रक्कम देऊनही ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाचोरा, चोपडासह इतर ठिकाणची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. या इंजेक्शन अभावी रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तरीही शासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे दिसत नाही,” असेही गिरीश महाजन म्हणाले.
हे ही वाचा:
संजय राऊत यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाली होती पवार-राऊत भेट
नव्या कोरोनाची प्राणघातकता कमी
राहुल गांधी पाकिस्तानी ‘प्रॉपगॅन्डा’ चालवत आहेत का?
राजकीय मिस मॅनेजमेंट मुळे महाराष्ट्र इटलीच्या मार्गावर
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, असे सांगितले आहे. मग ते रुग्णांना का मिळत नाही. त्याचा काळाबाजार होत आहे का? याचा तपास शासनाने करावा. तसेच झोपेतून जागे होऊन इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा करुन त्यांचे जीव वाचवावे, अशी मागणीही त्यांनी केली.