मुंबई पोलिसांना सेटलमेंटचे आदेश?

मुंबई पोलिसांना सेटलमेंटचे आदेश?

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. मानसिक आणि शारीरिक छळासह, पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप संजीवनी यांनी केला आहे. त्यानंतर खुद्द संजीवनी काळेंनी पाठवलेला एक व्हिडीओ भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. “त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?” असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे.

“नमस्कार चित्राताई, मी संजीवनी गजानन काळे, मी ११ तारखेला माझे पती गजानन काळेंवर एफआयआर दाखल केली होती, तीन दिवस उलटून झाले आहेत, तरीसुद्धा त्यांना अरेस्ट झालेली नाही, मला न्याय मिळालेला नाही, मी पोलिसांकडे गेले होते काल, तर पोलिसांनी माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सेटलमेंट करण्याचा विषय झाला” असं संजीवनी काळे व्हिडीओमध्ये म्हणतात.

“मला म्हणाले, तुला जे हवं ते मी करतो. त्याला घेऊन येतो मी पोलीस स्टेशनमध्ये, अशा पद्धतीने सेटलमेंटची भाषा माझ्यासोबत करण्यात आली आहे, तर चित्राताई मला न्याय हवा आहे, मला भीक नको आहे, मला न्याय हवा आहे, तो पण माझ्या मुलासाठी” अशी मागणी संजीवनी काळे या व्हिडीओच्या अखेरीस करताना दिसतात.

हे ही वाचा:

आता डिजिटल माध्यमे येणार या संस्थेच्या कक्षेत

महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या गुंडगिरीचा अडसर

अखंड भारत संकल्पदिनाला मोदींनी केले ‘हे’ ट्विट

महाग पेट्रोलवर हा नवा पर्याय येणार

“हे काय चाललयं राज्यात, आपण पोलिसांना गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीवर कारवाई न करता सेटलमेंट करा असे आदेश दिलेत का ? गुन्हा नोंद होऊनही नवी मुंबई पोलीस कार्यवाही का करत नाहीत? कुठल्या अधिकारात सेटलमेंट करण्यास सांगत आहेत? उत्तर द्या” अशी मागणी चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ शेअर करत केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलीस यांना ट्विटरवर टॅग करत चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Exit mobile version