राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा शरद पवारांनी यावेळी केली आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे जाहीर कारण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बोलताना ही घोषणा केली. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, प्रफुल्ल पटेल यांच्यावर मध्यप्रेदश, गुजरात, राजस्थान, झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सुनिल तटकरे यांनाही पक्षाचे सरचिटणीस केलं आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवली नसल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
या घोषणा होत असताना अजित पवार मात्र टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली फिरवताना दिसले. त्यावरून वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे निवडणुकांचीही जबाबदारी देण्यात आलेली असल्यामुळे अजित पवारांच्या हाती नेमके कोणते अधिकार राहिले आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रीय नव्हेच पण महाराष्ट्रातीलही कोणतीही जबाबदारी दिलेली नसल्यामुळे अजित पवार आता फक्त अधिवेशनापुरते विरोधी पक्षनेते असतील का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा:
धुळ्यात अनधिकृत टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटविले
सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन
पालखी मार्ग, वारकऱ्यांची विश्रांती स्थाने, पाण्याची व्यवस्था उत्तम राखा!
भाई जगतापांची गच्छंती, वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष
या कार्यक्रमाला अजित पवारही उपस्थित होते. त्यांनी निर्णयाची घोषणा होताच टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले मात्र, त्यानंतर माध्यमांशी बोलणे टाळत ते निघून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.