मराठीतून शिक्षण घेतलेल्या १५० उमेदवारांना तात्काळ शिक्षकपदी नियुक्त करा!

मराठीतून शिक्षण घेतलेल्या १५० उमेदवारांना तात्काळ शिक्षकपदी नियुक्त करा!

शिवसेनेचे मराठी प्रेम बेगडी असून त्यांनी केवळ मतांसाठी आणि राजकीय फायद्यासाठी मराठी माणसाचा वापर केला असल्याची सणसणीत टीका करत व्यावसायिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून पण केवळ दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातुन घेतलेल्या उमेदवारांना तात्काळ शिक्षकपदी नियुक्ती देण्याची मागणी भाजपाने केली आहे. ही नियुक्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.

महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी निवड प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही नोकरीसाठी डावललेल्या उमेदवारांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षनेता विनोद मिश्रा, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे, नगरसेवक पंकज यादव यांच्या शिष्टमंडळाने अन्यायग्रस्त उमेदवारांची भेट घेऊन आपला जाहीर पाठिंबा दिला.

दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना डावलणे म्हणजे मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुले आणि पालकांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. सदर उमेदवारांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असले तरी व्यावसायिक शिक्षण इंग्रजीतुन झाले असतानाही शिवसेनेचा मराठी विषयीचा आकस अनाकलनीय आहे. केवळ मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाच्या हक्काबाबत जागरूक होणाऱ्या शिवसेनेला मराठी माणसाला मिळणारी हक्काची नोकरी डावलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

याबाबत भाजपा शिक्षण समितीच्या सदस्यांनी वारंवार शिक्षण समितीच्या बैठकीत आवाज उठवूनही शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनीही याकडे कानाडोळा केला आहे अशी टीका शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी केली.

हे ही वाचा:

महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा

मिनी लॉकडाऊनचा निर्णय लवकरच

पडदा केव्हा उठणार?

प्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!

 

महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर, भूमिपुत्रांवर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी गाठ भाजपशी आहे, हे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे असा इशारा भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी दिला.

Exit mobile version