आधी सावरकरांची माफी मग, मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवा!

राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

आधी सावरकरांची माफी मग, मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवा!

राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राहुल गांधी यांच्या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांचे राजकीय वजन वाढणार असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी यांनी वारंवार वीर सावरकरांचा केलेला घोर अपमान उद्धव ठाकरे जाणून बुजून आठवणे टाळत आहेत. पण महाराष्ट्र मात्र हा अपमान विसरलेला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवरून थेट राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या केलेल्या अपमानाची राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवावे असा कडक इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. त्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आले आहे. राहुल गांधी यांची भेट उद्धव ठाकरे यांचे राजकीय वजन वाढवेल असेही बोलले जात आहे.

महाविकास आघाडीमध्ये आधीच बिघाडी झाली आहे. खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे काहीच उरलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातही कुरबरी सुरु आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी माविआची मोट कशी बांधणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातूनही सावरकरांच्या अपमान प्रकरणानंतर राज्यात तापलेलं वातावरण राहुल गांधी यांच्या आगमनानंतर आणखी तापण्याची चिन्हे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळा अपमान केला आहे . त्यांनी ही भूमिका अद्यापही बदलली नसून त्यांनी माफीही मागितली नाही. ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाहीत.

उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांची माफी मागावी मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा, अशी जोरदार मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती असे वक्तव्य करून राज्यात वाद निर्माण केला होता. एकीकडे ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत अशी टिप्पणीहि त्यांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र्रात आंदोलन पेटले होते.

अलीकडेच शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सावरकर यांचा उल्लेख करू नका असा सल्ला दिला होता. राहुल गांधी यांनीही आपण भाषणात सावरकरांचा उल्लेख करणार नाही असे म्हटले होते. पण अद्याप राहुल गांधी यांनी माफी मागितलेली नाही. यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले , सावरकर यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका, असं त्यांना अनेकांनी वारंवार समजावलं. तुमची ती उंची नाही आहे. तरीही त्यांनी अपमान केला.

हे ही वाचा:

अमित शहा आज मुंबईत येणार, पोलिसांचे सतर्कतेचे आदेश

…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!

ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार, दुहेरी बोगदा बांधकामाला मिळणार वेग

जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याची केली तक्रार

राहुल गांधी यांनी सावरकरांची अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. एकदाच नाही तर पाच वेळा जाणीवपूर्वक सावरकर यांचं नाव घेऊन टीका केली. त्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा असे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version