समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या घरालाच खिंडार पडले असून त्यांची सून अपर्णा यादव या भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत. उत्तरप्रदेश निवडणुकीच्या तोंडावर हा समाजवादी पक्षाला मोठा झटका मानला जात आहे. बुधवार, १९ जानेवारी रोजी अपर्णा यादव यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भरभरून तारिफ केली. ‘राष्ट्रधर्म’ आपल्यासाठी सर्वतोपरी असल्यामुळेच आपण भाजपामध्ये सामील होत असल्याचे अपर्णा यांनी सांगितले आहे.
मी राष्ट्रालाच नेहमी धर्म मानले आहे आणि जो काही निर्णय आजवर घेतला तो राष्ट्रासाठी घेतला आहे. ही माझी नवी सुरुवात आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून प्रभावित झाले आहे. त्यांची नीती मला वैयक्तिक पातळीवर खूप आवडते. म्हणूनच मी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला असे यादव यांनी सांगितले.
हे ही वाचा:
पर्यटन बंद झाले आणि थायलंडमध्ये माकडांनी शहरांत घातला धुमाकूळ
कोविड विरोधी लसीकरणात भारताने ओलांडला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा
गोव्यात काँग्रेसला महाविकास आघाडी झेपली नाही!
पण यावेळी त्यांनी आपल्या परिवाराच्या विरोधात कोणत्याही प्रकारची टिपणी करण्याचे टाळले आहे. अखिलेश यादव यांच्या बद्दल प्रश्न विचारला असता, ‘मी परिवाराच्या विरोधात काहीच बोलू इच्छित नाही असे त्यांनी सांगितले. हे माझे वैयक्तिक विचार आहेत. गेल्या पाच वर्षांत ज्या प्रकारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काम केले आहे, नव्या योजना आणल्या आहेत ते सर्वच खूप प्रभावशाली आहे असे अपर्णा यादव म्हणाल्या.
गेल्या काही दिवसांपासून अपर्णा यादव या भाजपावासी होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्या प्रकारच्या बातम्याही माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाले दिल्या जात होत्या. अखेर आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि नेते स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अपर्णा यादव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.