उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला सचिन वाझे वापरत असलेली अजून एक अलिशान गाडी एनआयएने ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. ही गाडी कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्क करण्यात आली होती. या गाडीची माहिती मिळाल्यानंतर एनआयएने ती ताब्यात घेतली आहे.
कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये बऱ्याच दिवसांपासून ही गाडी पार्क करुन ठेवण्यात आली होती. बरेच दिवस गाडी पडून असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी गाडीची माहिती पोलिसांना दिली. तपासानंतर या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाचा व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं. एनआयएला याची माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
दरम्यान, एनआयएने आतापर्यंत सचिन वाझे यांच्याशी संबंधित २ मर्सिडीज, १ प्राडो, इनोव्हा, स्कॉर्पिओसह एकूण ६ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. एनआयए या ६ गाड्यांव्यतिरिक्त एक आऊटलँडर, ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधात असल्याची माहिती मिळतेय.
हे ही वाचा:
ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
बेगम ममता बंगालला मिनी पाकिस्तान बनवेल
‘होला मोहल्ला’ दंगलप्रकरणात १७ जणांना अटक
रविवारी एनआयएला अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. मुंबई येथील मिठी नदीत हे पुरावे सापडले आहेत. सचिन वाझे याने हे पुरावे नष्ट करायच्या हेतूने मिठी नदीत टाकले होते. पण मनसुख हिरेन यांची हत्या होईपर्यंत हे पुरावे वाझेच्याच ताब्यात असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. मनसुख ह्याच्या हत्येनंतरच वाझेने हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.