पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या अनधिकृत बंगल्यांबद्दल माहिती देत शिवसेनेला बंगलो सेना म्हणणाऱ्या भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या अनधिकृत बंगल्यांना लक्ष केले आहे. यावेळी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधला, असा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकार नार्वेकरांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला.
“शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ७२ गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे.” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
“एका बाजूला कोव्हिडमुळे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्याच वेळेला शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात भव्य रिसॉर्ट आणि बंगले बांधत आहेत. असे असताना सरकार मात्र या दोघांना पाठीशी घालत आहे” असा आरोप करत किरीट सोमय्या हे नार्वेकर यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी दापोलीत दाखल झाले.
हे ही वाचा:
ट्विटरने पुन्हा जम्मू-काश्मीर आणि लडाख भारतापासून वेगळा दाखवला
रेस ट्रॅकवर गाड्या का आणल्या? याचे थक्क करणारे स्पष्टीकरण
ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचाच राजीनामा
पुलावामाध्ये माजी एसपीओची दहशतवाद्यांकडून हत्या
किरीट सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याला या प्रकरणात लक्ष्य केल्याने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.