माजी मुख्यमंत्री यांना एका मागून एक धक्के बसणे थांबलेले नाही. आमदारांच्या बंडानंतर आता खासदार देखील बंडाच्या तयारीत आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १४ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इतकेच नाही तर प्रतोद पदावरून हटवण्यात आलेल्या शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी या शिंदे गटाच्या नव्या व्हीप होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच भावना गवळी यांना व्हीप पदावरून पायउतार केले होते.
मोदी लाटेत निवडणूक जिंकलेल्या शिवसेनेच्या खासदारांना आता २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपाशिवाय कशी जिंकायची याची चिंता सतावत आहे. इतकेच नाही तर आमदारांच्या आधी शिवसेनेचे खासदारच बंडखोरीच्या तयारीत होते. त्यामुळे आमदारांच्या बंडखोरीनंतर आता या खासदारांचाही कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदारांच्या बंडाळीमुळे राज्यातील सत्ता गमवावी लागल्यानंतर खासदारांमधील फूट टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु खासदारांच्या या बैठकीला १९ पैकी फक्त १२ खासदार उपस्थित होते.
जे खासदार बैठकीला उपस्थित होते, त्यापैकी बऱ्याच जणांनी भाजपा आणि शिंदे गटाशी जुळवून घेण्याची व राष्ट्रपतिपदाच्या भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची मागणी केल्याने शिवसेनेची अडचण झाली होती. खासदार भावना गवळी देखील या बैठकीला अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यानंतर माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गवळी यांना प्रतोद पदावरून दूर केले होते.
हे ही वाचा:
“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”
भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला
अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू
१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान
सध्या शिवसेनेचे खासदार संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या खासदारांच्या दबावाखाली पाठिंबा दिला आहे, तर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार क्रॉस व्होटिंग करू शकतात.