पश्चिम बंगालमध्ये अजून एका भाजपा कार्यकर्त्याला फासावर लटकावले

पश्चिम बंगालमध्ये अजून एका भाजपा कार्यकर्त्याला फासावर लटकावले

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय हिंसाचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावर लटकवलेला मृतदेह आढळला आहे. पक्ष कार्यालयाच्या जवळच त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन भाजपा कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ही एकप्रकारे अमित सरकार यांची पूर्व नियोजित हत्याच आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात येतोय.

भाजपने या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा सध्या बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी विशेष पोलीस पर्यवेक्षकाकडे संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे.

हे ही वाचा:

इस्राएलमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरता?

प्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर

शिवसेनेवर काँग्रेसने केला ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

संजय राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही

भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी या घटनेवरुन तृणमूल काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. विजयवर्गीय यांनी ट्विटरवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. “दीदीचा खेळ सुरु, ममता सरकारचा राजनैतिक हिंसाचाराचा अंत अजूनही झालेला नाही. कूचबिहार लोकसभा क्षेत्रातील दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांना टीएमसीच्या गुंडांनी फाशीवर लटकवलं. राज्यात आतापर्यंत १३० पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे” असा आरोप विजयवर्गीय यांनी केलाय.

बंगालमध्ये २७ मार्चपासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ते २९ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर २ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

Exit mobile version