राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यांनंतर गुरुवार, १२ मे रोजी छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी आगामी काळातील राजकीय वाटचालीची घोषणा केली आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, अपक्ष म्हणून काही दिवसांनी होणारी राज्यसभा निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली आहे. त्यांनी संघटनेचे नाव देखील यावेळी घोषित केले.
संभाजी राजे म्हणाले, मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. समाजासाठी जे मी काम करतोय ते बघून मला खासदारकी दिली. त्यामुळे मला अनेक काम करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे छत्रपती संभाजी राजे यांनी जाहीर केले आहे. पुढे ते म्हणाले ‘स्वराज्य’ हे माझ्या नव्या संघटनेचे नाव असून या संघटनेचा प्रसार करण्यासाठी मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी पंतप्रधान मोदींना शाहू महाराजांचे पुस्तक दिले होते. मी छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांच्या विचारावर चालणार आहे. व्यापक दृष्टीकोणातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिल्लीत सुरू केली आणि हे इतिहासात पहिल्यांदा घडले आहे. माझ्या कामामुळे माझ्यावर विश्वास ठेवावा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मला साथ द्यावी, असे आवाहन छत्रपती संभाजी राजेंनी केले आहे.
हे ही वाचा:
मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले
पद्मश्री डॉ. रमाकांत शुक्ला यांचे निधन
अल जझिराच्या महिला पत्रकाराचा गोळीबारात मृत्यू
शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन
पुढे ते म्हणाले, २००७ पासून आतापर्यंत मी गोंदिया वगळता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला आहे. शिव-शाहू दौऱ्याच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मी उपस्थित केला. मागील १५ ते २० वर्षांत शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊ शकलो.