प्रसिद्ध गांधीवादी नेते अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहून त्यांच्या मद्य धोरणावरून त्यांची पोलखोल केली आहे. दोन पानी पत्र लिहून हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना सवाल विचारले आहेत.
अण्णांनी लिहिले आहे की, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच मी आपल्याला पत्र लिहित आहे. आज जी मद्य धोरणासंदर्भात चर्चा सुरू आहे, त्या अनुषंगाने मी हे पत्र लिहित आहे. गेल्या ४७ वर्षांपासून मी ग्रामविकास कार्यात स्वतःला झोकून दिले आहे आणि भ्रष्टाचारविरोधात आंदोलन करत आहे.
प्रथम आम्ही गावातील ३५ दारूभट्ट्या उद्धवस्त केल्या. लोकपाल आंदोलनात तुम्ही आमच्यासोबत आलात. तुम्ही आणि मनीष सिसोदिया राळेगणसिद्धी येथे आलात. गावात सुरू असलेले काम तुम्ही पाहिलेत. गेल्या ३५ वर्षांत गावात दारू, बिडी, सिगारेट यांची विक्री होत नसल्याचे तुमच्या लक्षात आले आणि त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली.
हे ही वाचा:
मुंबईतील ‘या’ गणेशोत्सव मंडळाने काढला तीनशे कोटींचा विमा
मंद घोडा जुना स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे बाराटक्के….
एकनाथ शिंदे यांच्यामुळे मेट्रो धावणार आहे
चित्रदुर्ग मठाच्या पुजाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप
अण्णांनी पुढे लिहिले आहे की, राजकारणात जाण्याआधी तुम्ही स्वराज हे पुस्तक लिहिले. त्यात ग्रामसभा, दारू याबद्दल भरभरून लिहिले. त्याची आठवण तुम्हाला करून देतो.
असे म्हणत अण्णांनी त्या पुस्तकातील उतारे पत्रात लिहिले आहेत. दारूचे दुकान उघडण्यासाठी ग्रामसभेची मंजुरी हवी. शिवाय, तिथे उपस्थित असलेल्या ९० टक्के महिलांनी याच्या बाजूने मतदान केलेले असले पाहिजे. ग्रामसभेत उपस्थित महिला सर्वसाधारण बहुमताच्या जोरावर दारूच्या दुकानाचा परवानाही रद्द करू शकल्या पाहिजेत.
अण्णा म्हणतात की, पण राजकारणात आल्यानंतर आपण हे आदर्श विसरलात. दिल्लीत जे दारूसंदर्भातील धोरण आहे त्यानुसार गल्लीबोळात दारूचे गुत्ते उघडता येतील अशी व्यवस्था केली जात आहे. दारू पिण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातूनच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळू शकते. जशी दारूची नशा असते तशीच सत्तेचीही नशा असते. आपण सत्तेच्या या नशेत चूर झालेला आहात, असे वाटू लागले आहे.
तुम्ही आंदोलनादरम्यानच राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आणि नंतर तुम्ही पक्षही काढला. उलट आम्ही राजकारण प्रवेशाच्या विरोधात होतो. लोकशिक्षणातून समाज घडविण्याचा आमचा विचार होता. पण तुम्ही पक्ष स्थापन करून आज दारूसंदर्भातील जे धोरण आखले आहे त्यावरून तुम्ही अन्य पक्षांप्रमाणेच वाटचाल करत आहात असे लक्षात येते आहे. यावरून आपली कथनी आणि करनी यात फरक आहे.