शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपा त्यांच्या विरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर हल्ला चढवला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनिल परब जेलमध्ये जाणारच असा विश्वास व्यक्त केला आहे. तर माझ्या तक्रारींच्याच आधारे अनिल परब यांच्यावर धाडसत्र सुरु झाल्याची खात्री असल्याचे सोमय्या म्हणाले.
अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टच्या संदर्भात सोमय्या यांनी भाष्य केले आहे. अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. आता चार दिवसापूर्वी केंद्र सरकारने या बाबत निर्देश दिल्येत की अनिल परब यांना २ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. ती आता संपली आहे. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारने वीज पाणी बंद केलं पाहिजे.
अनिल परब यांच्यावर होणारी कारवाई ही मी केलेल्या त्या तक्रारीचा आधारित आहे असं दिसतंय. अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी २५ कोटी रुपये वापरले आहेत हे २५ कोटी रुपये ब्लॅकमध्ये वापरले असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सात कोटी रुपये व्हाईटचे वापरले. पण या दोन्ही २५ कोटी काळा पैसा आणि ७ कोटी व्हाईट यातील हिशोब आपल्या चोपड्यात दाखवलेलं नाही.
हे ही वाचा:
सचिन वाझे देणार अनिल देशमुखांविरोधात साक्ष
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! २० जूनला होणार मतदान
यशवंत जाधवांना ईडी पुन्हा समन्स पाठवणार?
मोदी सरकारच्या काळात डिजिटल पेमेंटमध्ये भारत नंबर वन
सात कोटी रुपयांचा चेक देण्यात आला तो अनिल परब यांचा पार्टनर सदानंद कदमनी दिला. त्याने अशा प्रकारचे वेगवेगळ्या रकमेचे चेक दिले. अनिल परब या रिसॉर्टचे मालक आहेत. इलेक्ट्रिक मीटर अनिल परब यांच्या नावे आहे. ठाकरे सरकार आल्यानंतर त्याचा प्रॉपर्टी टॅक्स अनिल परब भारत आहेत. परंतु अनिल परब यांनी कोणत्याही चोपड्यात प्रॉपर्टी दाखवलेली नाही. म्हणून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मी आग्रह केला आहे की बेनामी प्रॉपर्टी कायद्याच्या अंतर्गत अनिल परबवर कारवाई झाली पाहिजे. मला विश्वास आहे की अनिल परब यांची मालमत्ता लवकरच बेनामी घोषित केली जाणार आहे.
अनिल परब यांनी रिसोर्टसाठी वापरलेला हा काळा पैसा कुठून आलाय? तो बजरंग खरमाटे कडून आला आहे? पोलिसांच्या बदल्या मधून आला आहे? की तो सचिन वाझे कडून आलेला पैसा आहे? याचा तपास ईडीला करावा लागेल असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान गुरुवार २६ मे रोजी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने धाड टाकली असून सकाळपासूनच ईडीचे अधिकारी तपास करताना दिसत आहेत. अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यामध्ये परब यांचे शिवालय हे शासकीय निवासस्थान, बांद्रा येथील निवासस्थान, दापोली येथील रिसॉर्ट यांचा समावेश आहे. या सोबतच परब यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. या कारवाईतून ईडीच्या हाती काय लागणार आणि या तपासातून काय पुढे येणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.