‘अनिल परबांवर ईडीची कारवाई सुरू झाली आहे. अनिल देशमुख, नंतर नवाब मलीक आणि आता अनिल परबांनीही आपल्या कपड्यांची बॅग तयार ठेवावी’ असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. अनिल परब यांच्यावर शेकडो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांनी आपला बोरियाबिस्तर बांधायला घ्यावा असे सोमय्या म्हणाले. शिवसेना नेते महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची धाड पडल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब यांना या प्रकरणात अटक होणार असेच सोमय्या सुचवतात.
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने धाड टाकली आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यामध्ये परब यांचे शिवालय हे शासकीय निवासस्थान, बांद्रा येथील निवासस्थान, दापोली येथील रिसॉर्ट यांचा समावेश आहे. या सोबतच परब यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. या कारवाईतून ईडीच्या हाती काय लागणार आणि या तपासातून काय पुढे येणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
अनिल परबांवर ईडीची धाड! सात ठिकाणी छापेमारी, गुन्हासुद्धा दाखल
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर
आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले
या कारवाईनंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेली भारतीय जनता पार्टी ठाकरे सरकार विरोधात अधिक आक्रमक होताना दिसत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या हे सुरुवातीपासूनच अनिल परब यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत आले आहेत. या मध्ये दापोली येथील रिसॉर्टचे अवैध बांधकाम, बदल्यांमधील घोटाळा अशा गोष्टींचा समावेश आहे.