महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवले असून बुधवारी त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांना मनीलॉन्डरिंग प्रकरणात हे समन्स धाडण्यात आले आहे. दापोली, रत्नागिरी येथील त्यांच्या रिसॉर्टप्रकरणी हे समन्स पाठविण्यात आले आहे.
सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधल्याप्रकरणी परब यांची चौकशी होणार आहे. त्यांच्यावर नुकतीच इडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून सात ठिकाणी छापेमारी केली होती. त्यांच्या नातेवाईकांवरही धाडी टाकण्यात आल्या होत्या.
सदानंद कदम आणि संजय कदम या दोन्ही शिवसेना नेत्यांचीही चौकशी ईडीच्या माध्यमातून करण्यात आली. कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे बंधू होत. कांदिवली येथून ते आपला व्यवसाय करतात. संजय कदम यांचा केबल टीव्हीचा व्यवसाय आहे.
हे ही वाचा:
‘क्रांतिकारी गॅलरीतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल’
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याशेजारी सापडला अजगर; सर्पमित्रांनी वाचवले
‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’
अनिल परब यांनी दापोलीत २०१७मध्ये एक कोटीत जागा विकत घेतली होती. २०१९मध्ये या जागेची नोंदणी झाली होती. नंतर ती २०२०मध्ये सदानंद कदम यांना १.१० कोटींना विकण्यात आली. त्यावर रिसॉर्ट बांधण्यात आले होते. या रिसॉर्टविषयी संबंधित संस्थांना कळविण्यात आले नव्हते तसेच स्टँप ड्युटीही भरण्यात आली नव्हती. या रिसॉर्टच्या उभारणीसाठी ६ कोटींचा खर्च करण्यात आल्याची आयकर खात्याची माहितीही समोर आली आहे. शिवाय, झालेला खर्च अनिल परब किंवा सदानंद कदम यांच्या खात्यातही दिसत नाही, असेही आयकर खात्याचे म्हणणे आहे.