धुळ्यातील साक्री आगारात कामाला असणाऱ्या बस चालक कमलेश बेडसे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या घटनेमुळे सध्या राज्याचे राजकारण तापलेले दिसत आहे. या घटने नंतर भाजपा महाराष्ट्राने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अनिल परब जरा स्वतःच्या खात्याकडे लक्ष द्या’ असे म्हणत भाजपाने परबांवर निशाणा साधला आहे.
ठाकरे सरकार कडून वेळेवर पगार मिळत नाहीत म्हणून बेडसे यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. राहत्या घरात गळफास लावून बेडसे यांनी आत्महत्या केली आहे. बेडसे यांच्या आत्महत्येने परिवहन खात्यातील कर्मचाऱ्यांच्या अनियमित पगारांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी बेडसे यांच्या आत्महत्येचे वृत्त आले.
कमलेश बेडसे यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंबीय आणि धुळ्यातील एसटी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अपुऱ्या पगारामुळे बेडसे यांनी आपले जीवन संपवल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. मयत कमलेश बेडसे यांना सरकारकडून तात्काळ आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे.
जोवर कुटुंबाला आर्थिक मदत आणि पगाराची थकबाकी दिली जात नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा बेडसे कुटुंबीय आणि एसटी कामगार संघटनांनी घेतला. या घटनेची माहिती कळताच धुळ्यात अनेक ठिकाणी गाड्या थांबवून रस्त्यावर आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला. आगारात आणि महामार्गावर आहेत तिथे बसेस थांबवल्या गेल्या. त्यामुळे नागपूर सुरत महामार्गावर वाहतुक कोंडी झाली.
हे ही वाचा:
अमेरिकेने घेतला १३ जवानांचा बदला
नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल
अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे
दरम्यान या घटनेवरून राज्याचे राजकारण तापले असून भाजपाने ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. ‘अनिल परब गृह खात्यात ढवळाढवळ करण्यापेक्षा जरा स्वतःच्या खात्याकडे लक्ष द्या’ असा घणाघात भाजपा महाराष्ट्राने केला आहे. तर ‘जनाची नाहीच आहे, पण मनाची लाज शिल्लक असेल तर सर्व कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार त्वरित जमा करा’ अशी मागणी भाजपाने केली आहे.
अनिल परब…गृह खात्याच्या कामात ढवळाढवळ करण्यापेक्षा जरा स्वतःच्या खात्याकडे लक्ष द्या.
वेळेवर पगार मिळत नाहीत म्हणून बस चालक आत्महत्या करत आहेत.
जनाची नाहीच आहे, पण मनाची लाज शिल्लक असेल तर सर्व कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार त्वरित जमा करा.https://t.co/w7gGr8RQZw pic.twitter.com/fF256ppLLW
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 27, 2021