शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब हे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. अनिल परब यांच्यावर झालेल्या १०० कोटी वसुली प्रकरणातील आरोपांवरून परब यांची ईडी मार्फत चौकशी होणार आहे. त्यामुळे परब यांच्या या चौकशीतून काय नवे समोर येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर चौकशीनंतर परब यांचे भवितव्य काय असणार? याविषयीही चर्चा रंगताना दिसत आहेत.
शनिवार, २५ सप्टेंबर रोजी परब यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली होती. या नुसार आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी परब यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार परब हे आता ईडी कार्यलयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. या आधी ३१ ऑगस्ट रोजी परब यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण पुढे करत अनिल परब चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. पण यावेळी मात्र चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय परब यांनी घेतला आहे.
पुन्हा एकदा भावनिक शपथा
ईडी कार्यालयात रवाना होण्याआधी परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. परब हे सकाळी बांद्रा येथील आपल्या निवासस्थानातून आधी शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावेळी मध्यमसनही बोलताना त्यांनी आपण ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले. “मला का बोलावले आहे हे मला माहित नाही. पण मी याआधीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगितले होते की मी कोणतेही गैर कृत्य केले नाही. त्यामुळे मी चौकशीस सामोरे जात आहे.” असे परब म्हणाले