“अनिल देशमुख यांनी दिलेला राजीनामा हे या संपूर्ण प्रकरणातील हिमनगाचं केवळ टोक आहे.” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजच वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुखांवर करण्यात आलेल्या आरोपांचा तपास सीबीआयने पंधरा दिवसात करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर काही तासांतच अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.
अनिल देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी अनिल देशमुख, मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारला घेरले. “अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायला बराच उशीर झाला. खरंतर रश्मी शुक्ला यांच्या अहवालानंतरच त्यांचा राजीनामा व्हायला हवा होता. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर होते. या आरोपांनंतरही राजीनामा घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री या प्रकरणावर काहीही बोलत नाहीत, उलट सचिन वाझे हा काही लादेन नाही, असा बचाव करतात. या संपूर्ण प्रकरणावरील मुख्यमंत्र्यांचे मौन अत्यंत अस्वस्थ करणारं आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा?
अक्षय कुमार पाठोपाठ विकी कौशललाही कोरोनाची लागण
आता गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या तत्त्वाला अनुसरून राजिनामा द्यावा
गेल्या दीड महिन्यात ठाकरे सरकारच्या दुसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. “मी आधीच म्हणालो होतो हे सरकार स्वतःच्या वजनाच्या दबावाने पडेल. हे सरकार पाडायची आम्हाला घाई नाही. हे सरकार स्वतःच पडेल.” असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याशिवाय अनिल देशमुख यांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक आहे, अजून बरीच नावं, बरेच चेहरे समोर येतील. असंही त्यांनी सांगितलं.