महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने मुंबईत अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला आणले जाईल. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनाही काल रात्री अटक करण्यात आली होती. सीबीआयने दिल्ली आणि अलाहाबाद येथील त्यांच्या ठिकाण्यांवरही छापे टाकले होते.
दरम्यान, अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांनाही काल रात्री सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. चतुर्वेदी बाहेर पडल्यानंतर त्यांना वरळी सी लिंक परिसरात गाडी थांबवून सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. त्याच वेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याचं वृत्त आलं होतं. एकूण १० जणांच्या टीमने ही कारवाई केली होती. मात्र जावई गौरव चतुर्वेदी यांचं अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आला होता. अनिल देशमुख प्रकरणात यापूर्वी गौरव चतुर्वेदी यांचं नाव कधीही आलं नव्हतं. मात्र, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
हे ही वाचा:
भारत ओव्हलवर ५० वर्षांचा इतिहास मोडीत काढणार?
‘क्लिन चीट’ रिपोर्टसाठी सीबीआय अधिकाऱ्याला देण्यात आली लाच!
अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत ५ समन्स बजावली आहेत. त्यात पहिलं समन्स २५ जून रोजी देऊन २६ जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ २६ जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे ३ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. तिसरं समन्स बजावल्यानंतर ५ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स ३० जुलै रोजी पाठवून २ ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर १८ ऑगस्टला पाचवं समन्स होत. १६ ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना १८ ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख चौकशीसाठी गेले नव्हते. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.