४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त
सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची ४ कोटी २० लाखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. यासंदर्भातील माहिती ईडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. याआधी ईडीनं अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकले होते. तसेच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. या जप्त संपत्तीमध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
१ कोटी ५४ लाख रुपयांचा वरळीतला फ्लॅट आणि २ करोड ६७ लाख रुपयांची उरणमधील धुतुम गावातील जमीन जी सलील देशमुख यांच्या कंपनीच्या नावावर होती ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देऊन ते चौकशीला हजर राहीले नव्हते. पण ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने देशमुख यांची मालमत्ता जप्त केली आहे.
ED has attached immovable assets worth ₹4.20 Crore belonging to Anil Deshmukh and his family under PMLA in a corruption case.
— ED (@dir_ed) July 16, 2021
याअगोदर अनिल देशमुखांनी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी पूर्ण झाली. मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भातील आपला निकाल राखून ठेवला आहे. याआधी याच प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरमधील दोन परिच्छेद वगळण्यासाठी राज्य सरकारनंही याचिका दाखल केलीय. या दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
हे ही वाचा:
शरद पवारांचा वसुली एजन्ट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरेंचा अनिल परब
काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्वच नको
मुंबईत पुन्हा महापालिकेचे काम ‘चव्हाट्यावर’
अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा
ईडीने जप्त केलेली मालमत्ता ही नागपूरमधील असल्याची माहिती आहे. पण या मालमत्तेत नेमकं काय-काय आहे याचा खुलासा ईडीकडून करण्यात आलेला नाही. ईडीने आतापर्यंतच्या तपासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे येत्या काळात अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची चौकशी केली जाऊ शकते. ईडीने देशमुख यांच्या पत्नीला समन्स बजावले होते. पण देशमुखांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने अद्याप चौकशी झालेली नाही.