अनिल देशमुखांना हवं होतं मंत्रिपद; पण भाजपाचा नकार

अजित पवारांचा गौप्यस्फोट

अनिल देशमुखांना हवं होतं मंत्रिपद; पण भाजपाचा नकार

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिबीर शुक्रवार, १ डिसेंबर रोजी कर्जतमध्ये पार पडले. यावेळी अजित पवारांनी भाषणात तुफान टोलेबाजी करत शरद पवारांसह त्यांच्या गटातील अनेक नेत्यांची पोलखोल केली. शरद पवारांच्या धरसोड वृत्तीचा उल्लेख करत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला. याशिवाय शरद पवार गटात असलेले नेते अनिल देशमुख यांच्यावरही अजित पवारांनी टीकास्त्र डागत खळबळजनक दावा केला आहे.

माजी गृहमंत्री आणि सध्या शरद पवार यांच्यासोबत असलेले नेते अनिल देशमुख हे भाजपासोबत झालेल्या सर्व बैठकांना उपस्थित होते. भाजपाला अनिल देशमुख हे मंत्रिपदी नको होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. अजित पवार म्हणाले की, “अनिल देशमुख माझ्यासोबत सगळ्या बैठकांना होते. मला मंत्रिमंडळात स्थान हवं असं अनिल देशमुख म्हणाले होते. पण भाजपला ते मंत्रिमंडळात नको होते,” असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

“भाजपाला अनिल देशमुख मंत्रिमंडळात नको होते. आमच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यावेळी गेली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मधल्या कालखंडात आम्ही त्यांच्यावर बरेच आरोप केले आहेत आणि लगेच मंत्रिमंडळात आम्ही त्यांना घेत आहोत. त्यामुळे आमच्या विश्वासार्ह्यतेवर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्यांना घेता येणार नाही. त्यामुळे त्यांचं नाव कमी करण्यात आलं. त्यामुळे ते म्हणाले की, मला मंत्रीपद नाहीतर मी तुमच्यासोबत येणार नाही. हे स्पष्ट आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,” असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.

हे ही वाचा:

अजित पवारांनी पुन्हा केली शरद पवारांची पोलखोल

९७ तेजस विमाने, १५० हुन अधिक लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस सरकारने दिली मंजुरी!

दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग

अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. “मार्च २०२४ मध्ये पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होतील, असा अंदाज आहे. सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा लढवणार आहोत,” अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. याशिवाय त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. त्यांनी थेट तारखांचे आणि बैठकांचे दाखले देत शरद पवारांच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करून टाकली.

Exit mobile version