मनी लॉन्ड्रिंगप्रकणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. आता देशमुख यांची संपूर्ण दिवाळी ही तुरुंगातच जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कोठडीत पाठवण्यात आल्याने देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.
अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी आणि इंद्रपाल सिंग यांनी कोर्टात युक्तिवाद केला. देशमुख यांचं वय झालं आहे. त्यांचा खांदा निखळलेला आहे. त्यामुळे त्यांना एक सहकारी देण्यात यावा. तसेच त्यांना घरचं जेवण देण्यात यावं. त्यांना हायपर टेन्शन आहे आणि त्यांना कोविडची बाधाही झाली होती. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये अशी मागणी या दोन्ही वकिलांनी केली होती. मात्र, देशमुख हे तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांना अनेक नोटीसा पाठवल्यानंतरही ते चौकशीला आले नाहीत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांना कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली.
सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तेव्हापासून ते १२ तासांपेक्षा अधिक काळ या कार्यालयात होते. रात्री त्यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. १२.१५ वाजता त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे भवितव्य काय असेल त्याची घोषणा ईडीकडून करण्यात येणार होती. अखेर त्यांना ईडीने अटक केल्याचे स्पष्ट झाले आहे. PMLA कलम 19 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार देशमुख हे ईडीच्या चौकशीला योग्य प्रतिसाद देत नव्हते.अखेर मध्यरात्री १.०६ मिनिटांनी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.
ईडीने देशमुख यांना पाचवेळा चौकशीसाठी समन्स पाठविले होते. पण या ना त्या कारणाने देशमुख यांनी त्या समन्सना उत्तर दिले नाही किंवा ते ईडीसमोर हजरही झाले नाहीत. वेगवेगळे मार्ग वापरून ईडीपासून लांब जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्यामुळे आपण ईडीसमोर जाणार नाही, असे ते म्हणत होते. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर तो मार्ग देशमुखांसाठी बंद झाला. मुंबई उच्च न्यायालयानेही ईडीच्या चौकशीला कुठेही रोखले नाही. त्यामुळे तो मार्गही बंद झाल्यानंतर अखेर देशमुख हे ईडीसमोर हजर झाले.
हे ही वाचा:
भारतीयांना इस्रायलची मैत्री बहुमूल्य
जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य
धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!
‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’
केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने सचिन वाझेला असेच चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री साडे अकरा वाजता अटक केली होती. ईडी कडून कदाचित देशमुख यांना साडे अकरा वाजता अटक करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. शेवटी १ वाजल्यानंतर त्यांना अटक केली गेली.