माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्रिय सहभागी असल्याचा दावा ईडीकडून विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. वडिलांनी मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा आरोप ईडीने केला आहे.
अनिल देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबरला मध्यरात्री अटक करण्यात आली होती. सध्या देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. ऋषिकेश यांनी या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जाला ईडीने एका प्रतिज्ञापत्राद्वारे विरोध केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ऋषिकेश यांचाही सहभाग असून सर्व पैसा विविध कंपन्यांना दान म्हणून दाखविण्यात त्यांनी अनिल देशमुख यांना मार्गदर्शन केले असल्याचा आरोप या प्रतिज्ञापत्रात केला आहे. जर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला तर तो या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे प्रभावित करण्याची शक्यता आहे, हा जामीन मंजूर करू नये, असे ईडीने म्हटले आहे.
हे ही वाचा:
पेंग्विन पुन्हा ‘हाय- वे’च्याच हवाली!
खड्ड्यांमुळे रायफलमधून गोळी सुटली आणि जवानाचा गेला प्राण
पवार-परब बैठकीत साडेचार तास फक्त चर्चा
छत्तीसगडमध्ये १२०० जणांनी केला हिंदू धर्मात प्रवेश
अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांकडून अकरा कंपन्या चालविल्या जातात, असे प्राथमिक चौकशीमधून समोर आले आहे. या कंपन्यांपैकी अनेक कंपन्यांमध्ये ऋषिकेश हे संचालक किंवा भागधारक आहेत. तसेच या कंपन्यांचा व्यवहार संशयास्पद आहे, असा दावाही ईडीने केला आहे.
मात्र ईडी जाणीवपूर्वक आपल्याला या प्रकरणात अडकवत असल्याचा दावा ऋषिकेश यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे. अर्जावर आता ४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.