माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. “ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एक प्रस्ताव दिला होता. मात्र तो नाकारला. हा प्रस्ताव घेऊन एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. त्या व्यक्तीचे नाव समित कदम असे होते,” असा दावा अनिल देशमुख यांनी केला. अनिल देशमुख यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी अनिल देशमुख यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो दाखवत संबंध असल्याचे दावा केला आहे.
मात्र, अशातच आता समित कदम यांच्यासोबत आदित्य ठाकरेंचा फोटोही समोर आला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समित देशमुख आणि ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. “अहो अनिल देशमुख, फोटोवरूनच अर्थ काढायचे तर हा घ्या अजून एक फोटो. गृहमंत्री सारख्या अत्यंत जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्तीने असे बेजबाबदारपणे वागणं शोभत नाही. खरंच काही ठोस पुरावे असतील तर न्यायालयात जा. अकारण फेक नरेटीव्ह पसरवू नका,” असा टोला उपाध्ये यांनी अनिल देशमुख यांना लगावला आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, “तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरज येथील समित कदम या व्यक्तीला पाच ते सहा वेळा पाठवलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांवर खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला सांगितले. समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे अतिशय घरगुती संबंध आहेत. त्याची पत्नी फडणवीसांना राखी बांधते. समित कदम हे फडणवीसांच्या खूप जवळचे आहेत. समित कदम हा साधा नगरसेवकही नाही तरीही फडणवीसांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे,” असे दावे अनिल देशमुखांनी केले आहेत.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुखांनी ठाकरे पिता पुत्र, अजित पवार यांच्यासह इतरांवर खोटे आरोप आणण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला असा आरोप केला. अनिल देशमुख यांनी म्हटलं की, समित कदम इतका जवळचा माणूस आहे त्यामुळे सरकारने त्याला वाय सुरक्षा दिली. मिरज, सांगली भागात चौकशी केली तर समित कदम आणि फडणवीसांचे काय संबंध हे कुणीही सांगितले. माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. केवळ उद्धव ठाकरे, अजित पवार नाहीत तर त्यांची मुले आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावरही आरोप करायला सांगितले. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असं त्यांनी सांगितले.
“तेव्हा प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर आज उद्धव ठाकरे अडचणीत असते. एकतर जेलमध्ये जा, नाहीतर भाजपात या असं त्यांचे धोरण होते. माझ्यावर पहिला प्रयोग करण्यात आला तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला, तिसरा प्रयोग अजित पवारांवर आणि तो यशस्वी झाला,” असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, बात निकलेगी तो दूर तक जायेगी, सर्वकाही हळूहळू बाहेर येईल. समित कदमला मी कधीही पाहिलं नव्हतं. मी गृहमंत्री असताना रोज २०० लोक घरी भेटायला यायचे, मंत्रालयात अनेकजण भेटायचे. समित कदम हा देखील भेटला, त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडून आलोय असं सांगितले, त्यावेळी मी त्याला भेटलो तेव्हा हे सर्व सांगितले, असंही अनिल देशमुखांनी म्हटलं.