अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांचा मुक्काम आता ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत होणार आहे. शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

१०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले. ईडी मार्फत देशमुख यांची कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने त्याला नकार दिला असून अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझे १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

अहमदनगरमध्ये रुग्णालयात आग लागून १० जणांचा मृत्यू

कच्च्या तेलापाठोपाठ आता खाद्य तेलही झाले स्वस्त

 

उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा

अनेक महिने गायब असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सोमवारी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानकपणे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. या आधी कित्येक समन्स पाठवून देखील देशमुख चौकशीसाठी हजर होत नव्हते. पण सोमवारी अचानकपणे देशमुखांनी चौकशीसाठी हजेरी लावली. त्याच दिवशी रात्री एक वाजता त्यांना ईडीने अटक केली केली. तर दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंतची ईडी कोठडी सुनावली होती.

देशमुखांची ही कोठडी आज संपणार असून पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून पुन्हा देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ केली नाही. तर देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Exit mobile version