गृहमंत्र्यांच्या शासकीय कार्यालय आणि निवासस्थानातून खंडणी प्रकरणातले पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु आहे असा धक्कादायक आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. या प्रकाराची दखल घेत सीबीआयने आवश्यक ती करवाई करावी अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे ते आपला राजीनामा सुपूर्त करणार आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावरून आपण राजीनामा देत असल्याचे देशमुख यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसात सीबीआयनं पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात सिल्वर ओक वर बैठक झाली. या बैठकीनंतरच देशमुख राजीनामा देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले. सीबीआय चौकशीच्या कोर्टाच्या निर्णयामुळे अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा लागला आहे.
हे ही वाचा:
अक्षय कुमार पाठोपाठ विकी कौशललाही कोरोनाची लागण
आता गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या तत्त्वाला अनुसरून राजिनामा द्यावा
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतरही खंडणीच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर होणारे आरोप काही थांबत नाहीयेत. देशमुख यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर अवघ्या थोड्याच वेळात भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. “मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी.” असे खळबळजनक ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी..@AnilDeshmukhNCP @AmitShah
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 5, 2021