महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची निष्ठा ही खरंच वाखाणण्याजोगी आहे. कोविड होऊन इस्पितळात दाखल असतानाही देशमुख यांनी भारतविरोधी शक्तींना ट्विट करून सुनावणाऱ्या सेलिब्रिटीजची गुप्तहेर खात्यामार्फत चौकशी होणार असल्याचे सांगितले. निष्ठेशिवाय ही अशी तत्परता शक्यच नाही. पण ही निष्ठा आपल्या कामाप्रती नसून पवारांच्या चरणाशी वाहिलेली आहे आणि तीच मोठ्ठी गडबड आहे.
भारताच्या मुळावर उठलेल्या परदेशी शक्तींना जोरदार प्रत्युउतर देणाऱ्या भारतीय सेलिब्रिटीजनी ‘भारताचे अंतर्गत प्रश्न भारत सोडवेल, बाहेरच्यांनी त्यात ढवळाढवळ करू नये’ अशी ठाम भूमिका घेतल्यावर अनिल देशमुखांच्या पोटात का कळ उठावी? नको त्या विषयात ‘कर्तव्यपूर्तीची’ जाणीव झालेले अनिल देशमुख जेव्हा गेले वर्षभर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता तेव्हा कुठे होते?
रिहाना, ग्रेटा, मिया, मीना आणि यांच्यासारख्या इतर अनेक पुरोगामी काकूंच्या ट्विटरवरील अब्रूची रक्षा करायला अनिल देशमुख पुढे सरसावले, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात आज महिला सुरक्षेचा जो बोजवारा उडाला आहे त्याचे काय? ३ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ९० वर्षांच्या वयस्कर स्त्री पर्यंत कोणीही सुरक्षित नाही. महाराष्ट्रात तर कोविड सेंटर मध्ये बलात्काराच्या भयंकर घटना घडल्या आहेत. याला आळा बसावा यासाठी अनिल देशमुखांनी नेमके काय आणि किती प्रयत्न केले?
महाराष्ट्रात तर सत्ताधारी पक्षांचे केवळ कार्यकर्तेच नाही तर थेट मंत्र्यांवरच गंभीर गुन्ह्यांचे आरोप होताना दिसत आहेत. यावर देशमुख यांना बोलावेसे वाटत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्याच पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात वेळोवेळी कायदा हातात घेताना दिसतात. मग कधी कोणाचे केस भादरणे असेल किंवा एका व्यंगचित्रावरून माजी नौदल अधिकाऱ्याला केलेली मारहाण असले किंवा कोल्हापुरातील अगदी ताजी घटना असेल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका माणसाला काळे फासून, साडी नेसवून, गळ्यात बांगड्या घालून रस्त्यावरून धिंड काढली. ते करताना पोलीस कारवाईची जराशीही भीती त्यांना वाटली नाही. याचा अर्थ असा होतो, की गृह खात्याचा त्यांना धाकच उरला नाहीये किंवा अनिल देशमुख हे खाते सांभाळत असल्यामुळे आपल्याला नैसर्गिक अभय मिळाल्याची त्यांना खात्री पटली आहे.
हे झालं कार्यकर्त्यांचे, देशमुखांचे पक्षातले आणि मंत्रिमंडळातले सहकारीही काही कमी नाहीत. धनंजय मुंडेंचे उदाहरण ताजेच आहे. धनंजय मुंडेंच्या मेहुणीने त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली आणि नंतर ती मागेसुद्धा घेतली. तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर कोणाचा दबाव होता का? याची गुप्तहेर खात्यामार्फत चौकशी होणार का? आता तर मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीनेही त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. आपल्या मुलांच्या जीवाला धनंजय मुंडेंपासून धोका असल्याचे म्हंटले आहे. या प्रकरणात अनिल देशमुख अशीच कार्यतत्परता दाखवणार का? त्यांचेच दुसरे एक सहकारी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नयन अनंत कारमुसे नावाच्या एका तरुणाला मारहाण करण्यात आली. त्याला तर बंगल्यावर घेऊन जाणारे पोलिसच होते. त्या प्रकरणाचा किती पाठपुरावा देशमुखांनी केला हे त्यांनाच ठाऊक. देशमुख यांच्या नेतृत्वात गृहखात्याचा कारभार बघताना कुंपणच शेत खात असल्याची शंका उद्भवते. कारण जेव्हा संपूर्ण देशात कडक लाॅकडाऊन सुरू होता तेव्हा एका मोठ्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाऊन सुट्टी उपभोगण्यासाठी शिफारस पत्र थेट गृहखात्याच्या मुख्य सचिवांकडूनच मिळाले होते. यावरून एकूणच गृहखात्याचा कारभार किती भोंगळपणाचा आहे याचा अंदाज येतो.
परवा पालघरमध्ये एका नौदल अधिकाऱ्याची जाळून हत्या करण्यात आली. अंदाजे दहा महिन्यांपूर्वी याच पालघरमध्ये हिंदू साधूंचे ‘मॉब लिंचिंग’ झाले होते. म्हणजे दहा महिन्यांत कायदा सुव्यवस्थेची स्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. २०१७-१८ साली महाराष्ट्रात एल्गार परिषद नावाची एक कीड दिसली होती. समाजात द्वेष पसरवणाऱ्या वक्त्यांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम या परिषदेने केले होते. २०१७-१८ साली तोंड पोळल्यानंतरही गृहखात्याने यावर्षी पुन्हा या परिषदेला परवानगी दिली. परिणामी शर्जील उस्मानी नावाच्या जिहादी विचारांच्या तरुणाने हिंदू समाजाविरोधात गरळ ओकायचे काम केले. त्याच्याविरोधात साधा एफआयआर दाखल करायला गृहखात्याने दोन दिवस घेतले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सगळ्याच मंत्र्यांची आणि त्यांच्या खात्यांची कामगिरी ही एका पेक्षा एक ‘दमदार’ राहिली आहे. पण त्यातही सगळ्यात वाईट कारभार कोणाचा याची क्रमवारी लावायची झालीच तर अनिल देशमुख आणि गृहखात्याच्या क्रमांक खूप वरचा असेल. हा असाच कारभार सुरु राहिला तर ‘खल रक्षणाय, सद निग्रहणाय’ व्हायला फार वेळ लागणार नाही.