महापौरांसह अनिल बोंडे यांना अटक, नागपूरमध्ये १४४ कलम लागू

महापौरांसह अनिल बोंडे यांना अटक, नागपूरमध्ये १४४ कलम लागू

अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी अटक सत्र सुरु केले आहे. दरम्यान भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना अटक केली असल्याचे वृत्त ‘साम टीव्ही’ने दिले आहे. भाजपच्या इतरही काही कार्यकर्त्यांना अटक होण्याची चिन्हे असून काही कार्यकर्त्यांच्या घरांची झडती सुरू असल्याचे वृत्त आहे.

शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागून दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. राज्य सरकारने या घटनांची दखल घेत अमरावती येथे कलम १४४ लागू केले. नागपुरातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने शहरात १४४ लागू करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कार्तिकी एकादशीला माऊलीची आणि लेकरांची भेट होणार…

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

शिवप्रेमींची बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी; राजकीय नेत्यांनीही घेतले दर्शन

‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

नागपूरमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १४४ कलम लागू केले आहे. शहरात संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरात मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवल्या जाणार नाही, त्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे.

त्रिपुरा येथील घटनेचे अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे तीव्र पडसाद उमटले होते. अमरावती येथे मोठा हिंसाचार झाला. नागपुरात याचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेता रविवारी (१४ नोव्हेंबर) रात्री १२ वाजल्यापासून पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले.

Exit mobile version