आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

आंध्र प्रदेशच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. राज्यातल्या संपूर्ण कॅबिनेटने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे बुधवार, ६ एप्रिल रोजी राजीनामा सुपूर्द केला आहे. यामध्ये २४ मंत्र्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी संपूर्ण कॅबिनेटमध्ये बदल करण्याची तयारी सुरु केली असून नव्या मंत्रिमंडळात फक्त एक किंवा दोन जुन्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. २०१९ च्या निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर जगनमोहन रेड्डींनी यासंदर्भातली घोषणा केली होती. रेड्डी म्हणाले होते की, त्यांच्या अर्ध्या कार्यकाळातच नवीन टीमची नियुक्ती केली जाईल. तसेच हे नवे बदल २०२१ च्या डिसेंबरमध्येच होणार होते. मात्र, कोरोना महामारीच्या संकटामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मंत्रिमंडळातल्या बदलासंदर्भातली माहिती दिली होती. ११ एप्रिलला नव्या मंत्रिमंडळाची स्थापना केली जाण्याची शक्यता आहे. यात नवीन २६ जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका मंत्र्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाणार आहे. प्रत्येक जात, क्षेत्र, धर्मातल्या महिला, पुरुषांना ही संधी दिली जाणार आहे. २०१९ मध्ये मंत्र्यांना जबाबदारी सोपवतानाच अडीच वर्षासाठी त्यांना मंत्रिपद दिले जात आहे हे त्यांना सांगण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले होते.

हे ही वाचा:

मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव; संजय राऊतांचा नवा आरोप

UNHRC मधून रशिया निलंबित

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

२०१९ मध्ये जगनमोहन रेड्डींनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वसमावेशक मंत्रिमंडळाची स्थापना केली होती. आता नव्या मंत्रिमंडळातही हेच समीकरण पाहायला मिळू शकतं. जुन्या मंत्रिमंडळात जगनमोहन रेड्डींनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि मुस्लिम समुदायातून पाच उपमुख्यमंत्र्यांची निवड केली होती. कॅबिनेटमध्ये तीन महिलांचाही समावेश होता.

Exit mobile version