….आणि राज्यात पुन्हा उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा

….आणि राज्यात पुन्हा उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा

‘शर्यत रामेश्वरी, बंदोबस्त सोमेश्वरी’

गेल्या काही दिवसांपासून बैलगाडा शर्यत हा राज्यात चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशी घोषणा केली होती की, राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी असली तरी आपण बैलगाडा शर्यत आयोजित करणार. ही घोषणा पडळकरांनी खरी करून दाखवली आहे. शुक्रवार, २० ऑगस्ट रोजी राज्यात बैलगाडा शर्यतीचा पुन्हा एकदा धुरळा उडाला आहे आणि तो सुद्धा एकदम फिल्मी स्टाईल मध्ये.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीची मोठी परंपरा आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या शर्यतीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. मात्र यावर्षी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यात बैलगाडा शर्यत भरणारच असा निर्धार केला होता. सांगली मधील झरे गावात या शर्यतीची तयारी करण्यात आली होती. ही शर्यत पार पडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता. पण तरीही पोलिसांना चकवा देत पडळकर यांनी यशस्वीरित्या या शर्यतीचे आयोजन करून दाखवले. त्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी थेट गनिमी काव्याचा वापर केला.

सांगलीतील झरे गावाच्या हद्दीत चार वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीची जय्यत तयारी करण्यात आली. पण ही शर्यत यशस्वी होऊ नये त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता. झरे आणि आसपासच्या गावांमध्ये संचारबंदी लावण्यात आली होती. तर शर्यतीच्या नियोजित ठिकाणांना पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पण प्रत्यक्षात मात्र या चार ठिकाणांच्या व्यतिरिक्त वेगळ्या ठिकाणी ही शर्यत भरवण्यात आली. शेवट पर्यंत पोलिसांना या ठिकाणाचा पत्ताच लागला नाही.

हे ही वाचा:

सैफ-अर्जूनच्या ‘भूत पोलिस’ चा ट्रेलर प्रदर्शित

प्रदूषणमुक्तीच्या नव्या प्रकल्पाला पालिकेची ‘मिठी’

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही थोडे ब्रह्मज्ञान द्यावे

तालिबानी पिलावळीचा धोका…

यासाठी पद्धतशीरपणे नियोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आधीच शर्यतीच्या ठिकाणाची माहिती कळविण्यात आली होती. मध्यरात्रीपासूनच हे सहभागी होणारे शेतकरी शर्यतीच्या ठिकाणी माळरानावर आणले गेले होते. तर पहाटेच्या सुमारास काही मोजक्या समर्थक आणि दर्शकांना शर्यतीच्या ठिकाणाची माहिती देत रानवाटेतून शर्यतीच्या ठिकाणी आणले गेले.

अशाप्रकारे शर्यतीत भाग घेणाऱ्या सात स्पर्धाकांसोबत शेकडो लोखांच्या उपस्थितीत ही शर्यत पार पडली. या आयोजनामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांचा हटके अंदाज पुन्हा एकदा सर्वांना दिसून आला आहे.

Exit mobile version