उद्योजक आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना फटकारले

उद्योजक आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना फटकारले

ट्विटरवर प्रचंड सक्रिय असणारे उद्योजक आनंद महिंद्रा हे पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून महिंद्रा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीला लागायचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्यामुळे महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

महाराष्ट्रात सध्या कोविडची पारिस्थिती बिकट झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ही परिस्थिती नियंत्रणात आणताना सपशेल अपयशी ठरलेले दिसत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांवर सगळे खापर फोडत प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. यावरून मुख्यमंत्री ठाकरे हे टीकेचे धनी होताना दिसत आहेत. राज्यातील विरोधीपक्षापासून ते सर्वसामान्य नागरिक आणि उद्योगपतीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

संजय राऊतांवर ट्वीट करून शरद पवारांना आवाहन करण्याची वेळ

मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

इस्रोकडून हरित इंधन निर्मीतीचे प्रयत्न वेगात सुरू

काय म्हणाले महिंद्रा?
सोमवारी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना समजुतीचे चार शब्द सुनावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची बातमी शेअर करत महिंद्रा म्हणतात, “उद्धव ठाकरेजी लॉकडाऊनचा सर्वात जास्त त्रास हा छोटे उद्योग, कामगार आणि विस्थापित मजुरांना होतो. पहिल्यांदा करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उद्देशच मुळात रुग्णालये आणि आरोग्यसुविधा उभारणीसाठीचा वेळ मिळावा हा होता.”
हे ट्विट करत महिंद्रा यांनी एकप्रकारे ठाकरे सरकार आरोग्यसुविधा उभारणीत कशाप्रकारे कमी पडल्याचे अधोरेखित केले आहे.

केंद्र सरकारलाही केले आवाहन
ठाकरे सरकारला फटकारल्यानंतर महिंद्रा यांनी पुन्हा एक ट्विट करत केंद्र सरकारला आवाहन केले आहे. महाराष्ट्रात लसीकरणावर कोणतेही निर्बंध न ठेवता सरसकट सगळ्यांचे लसीकरण करण्यास केंद्राने परवानगी द्यावी अशी विनंती महिंद्रा यांनी केली आहे. त्यासोबतच खाजगी क्षेत्रालाही यात सहभागी करून घ्यावे जेणेकरून लसीकरणाची प्रक्रिया अधिक जलद होईल असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

Exit mobile version