निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे एक कथित पत्र मीडिया आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. या पत्रात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी आपल्याकडे दोन कोटी रुपये मागितल्याचा गौप्यस्फोट वाझे याने केला आहे. अनिल देशमुख यांच्यासोबतच त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही नावे घेतली आहेत. एनआयए कडून न्यायालयात हे पत्र सादर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे. बुधवारी वाझे याचे एक कथित पत्र समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाला उद्देशून वाझेने हे पत्र लिहिले आहे. या पत्रात वाझे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लाच मागितल्याचे आरोप केले आहेत. कोरोना काळात वाझे याला पुन्हा पोलीस दलात बहाल केले तेव्हा अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी दोन कोटी रुपये मागितल्याचा खळबळजनक दावा वाझेच्या पत्रात करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
अयोध्येतील रस्त्याला कोठारी बंधूंचे नाव
नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही विनापरीक्षा पास करणार
काय आहे वाझेचा दावा?
वाझे आपल्या या कथित पत्रात म्हणतात. “मला पोलीस दलात पुन्हा घेतल्यानंतर या विरोधात नाराजीचा सूर उमटत होता आणि मला पोलीस दलातून पुन्हा काढून काढावे यासाठी प्रयत्न सुरु होते. यानंतर माननीय शरद पवार यांनी देखील मला पुन्हा निलंबित केले जावे असे मत व्यक्त केले. ही सर्व माहिती मला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला दिली. देशमुख यांनी मला ते शरद पवार साहेबांना समजावतील पण त्यासाठी २ कोटी रुपये द्यावे लागतील असे देशमुखांनी सांगितले. मी हे पैसे देण्यासाठीची अपात्रता दर्शवली तेव्हा भविष्यात हे पैसे देण्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी सांगितले.
जानेवारी २०२१ मध्ये गृहमंत्र्यांनी मला त्यांच्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी बोलावले. त्यावेळी त्यांचे स्विय सहाय्यक कुंदनही उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी मला सांगितले की मुंबईत अंदाजे १६५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्या सगळ्यांकडून महिना ३ – ३.५ लाख त्यांच्यासाठी जमा करण्यास सांगितले.”
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर वाझेच्या माध्यमातून १०० कोटीची खंडणी वसूल करत असल्याचा लेटर बॉम्ब टाकल्यानंतर देशमुख अडचणीत आले. त्यांचे गृहमंत्री पदही गेले. त्यात आता वाझे यांच्या या नव्या पत्राने देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.