बंगाल मधील विश्व भारती विश्वविद्यालयाची जमीन अनधिकृतरित्या अनेक खासगी भूभागधारकांच्या नावे केली गेल्याचे उघडकीस आले आहे. विश्व भारतीने यासंबंधी बंगाल सरकारला पात्र लिहिले आहे. अनधिकृतरित्या जमीन अधिग्रहण करणाऱ्यांच्या यादीत नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचेही नाव आहे.
अमर्त्य सेन यांच्या वडिलांना विश्व भारतीने १२५ डेसिमल इतकी जागा लिजवर/ भाडे तत्वावर देण्यात आली होती. पण आता सेन यांच्याकडे १३ डेसीमल इतकी जागा अवैधरित्या आढळली. विश्व भारतीच्या म्हणण्यानुसार १९८० -९० मध्ये असे बरेच भूखंड हे निवासाच्या कारणासाठी भाडेतत्वावर देण्यात आले. हे बहुतांश भूभाग शांतिनिकेतन मधल्या पूर्वपल्ली भागातील आहेत.
विश्व भारतीने या भूखंड घोटाळ्याविषयी शिक्षण मंत्रालय आणि महालेखापालांना माहिती दिली आहे. विश्व भारती हे ऐतिहासिक वारसा लाभलेले विश्वविद्यालय आहे,ज्याची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केली. हे देशातील एकमेव विश्वविद्यालय आहे ज्याचे भारतीय पंतप्रधान कुलगुरू असतात. विश्व भारतीचे हे शताब्दी वर्ष आहे. अशातच अशा घोटाळ्यांच्या बातम्या येणे खूपच दुर्दैवी आहे.